राष्ट्रीय

Special Intensive Revision : बिहार निवडणुकीनंतर निवडणूक आयोग १२ राज्यांमध्ये राबविणार 'एसआयआर'

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

SIR Implementation 12 states After Bihar Polls

नवी दिल्‍ली: मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर)चा दुसरा टप्‍पा लवकरच १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज (दि. २७) केली.

'या' १२ राज्‍यांमध्‍ये राबवली जाणार एसआयआर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले की, अंमतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर)चा दुसरा टप्‍पा उद्या, २८ ऑक्टोबर रोजी सुरू होईल. गोवा, अंदमान आणि निकोबार, छत्तीसगड, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्‍यात एसआयआरचा दुसरा टप्‍पा राबवला जाईल. या प्रक्रियेत मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदार जोडणे आणि मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करणे समाविष्ट असेल. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्या आज (दि. २७) रात्रीपासून गोठवल्या जातील.

SIR होणार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका केव्‍हा?

  • २०२६: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी

  • २०२७: गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश

  • २०२८: छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान.

  • अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये विधानसभा नाही.

बिहारने ठेवले देशासमोर उदाहरण

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना कुमार म्हणाले, “मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्‍यात आला आहे. मी एसआयआरच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात भाग घेतलेल्या बिहारच्‍या ७.५ कोटी मतदारांसमोर नतमस्तक होतो. आयोगाने सर्व ३६ राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेट घेतली आणि प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली. बिहारमधील पहिल्या टप्प्यात ९०,००० हून अधिक मतदान केंद्रांवर यशस्वी मतदार पडताळणी झाली. कोणतेही अपील झाले नाही. बिहारमधील मतदारांच्या सहभागाने देशाच्या उर्वरित भागासाठी एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.”

अशी राबवली जाणार प्रक्रिया

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १२ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणीच्या (SIR) दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले.

  • छपाई/प्रशिक्षण - २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५

  • घरोघरी जाऊन गणनेचा टप्पा - ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५

  • मतदार याद्यांचे मसुदा प्रकाशन - ९ डिसेंबर २०२५

  • दावे आणि हरकतींचा कालावधी - ९ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६

  • सूचना टप्पा (सुनावणी आणि पडताळणी) - ९ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६

  • अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन - ७ फेब्रुवारी २०२६

कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, "ज्या राज्यांमध्ये SIR केले जाईल त्या सर्व मतदार यादी गोठवल्या जातील. त्या यादीतील सर्व मतदारांना BLO कडून युनिक गणन फॉर्म दिले जातील. या गणन फॉर्ममध्ये सध्याच्या मतदार यादीतील सर्व आवश्यक तपशील असतील. BLO कडून विद्यमान मतदारांना फॉर्म वाटण्यास सुरुवात झाल्यानंतर, ज्यांची नावे गणन फॉर्ममध्ये आहेत ते सर्व त्यांची नावे २००३ च्या मतदार यादीत होती की नाही हे जुळवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. एखाद्याचे मतदार यादीमध्‍ये नाव नसेल, परंतु त्यांच्या पालकांची नावे यादीत असतील, तर त्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. २००२ ते २००४ पर्यंत SIR ची मतदार यादी http://voters.eci.gov.in वर कोणीही पाहू शकेल आणि ते स्वतः पडताळणी करू शकतात."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT