नवी दिल्ली : पीटीआय
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. सोने दहा ग्रॅममागे एक हजार 910 रुपयांनी आणि चांदीच्या दरात किलोमागे तब्बल 13 हजार रुपयांनी घट झाली आहे. हे दर देशपातळीवरील असून, प्रत्येक ठिकाणी स्थानिक कर वेगवेगळे असल्याने दरांत तफावत असू शकते.
सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,910 रुपयांनी घटून 1 लाख 30 हजार 860 रुपयांवर आला आहे; तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,750 रुपयांनी घटून 1 लाख 19 हजार 950 रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव 1 लाख 85 वरून 1 लाख 72 हजार रुपयांवर घसरला आहे. चांगल्या दराचा फायदा घेण्यासाठी सटोडियांनी विक्री केल्याने दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर उच्चांकी पातळीवर गेले होते.
पुण्यात चांदीचा दर 1.78 लाख
धनत्रयोदशीनिमित्त सोने आणि चांदीची नाणी, लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा, वेढणी यांना चांगली मागणी आहे. वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1 लाख 32 हजार रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 22 हजार 570 रुपये आहे. चांदीचा प्रतिकिलो भाव 1 लाख 78 हजार रुपये असल्याची माहिती पुण्यातील सराफ व्यावसायिक वस्तूपाल रांका यांनी दिली.