डॉ. नवज्योत कौर यांनी गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे खुलेआम कौतुक केले आहे. "भाजपनेच माझ्यातील कौशल्याची कदर केली होती," अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Navjot Kaur Sidhu expelled from Cong
चंदीगड : एकीकडे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू सध्या टीव्हीवरील कॉमेडी शोमध्ये हास्यविनोदात मग्न आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांची काँग्रेसने पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्व आणि सिद्धू दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाचा हा परिपाक मानला जात आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडताना डॉ. नवज्योत कौर यांनी राहुल गांधींवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. भाजपने राहुल गांधींच्या प्रतिमेला छेद देण्यासाठी वापरलेला “पप्पू” हा शब्द वापरत त्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. काही आठवड्यांपूर्वीच सिद्धू दाम्पत्याने राहुल आणि प्रियंका गांधी यांचा उल्लेख आपले ‘मार्गदर्शक’ असा केला होता. मात्र, आता हा प्रवास पुन्हा त्याच जुन्या टीकेपर्यंत येऊन पोहोचल्याने सिद्धू दाम्पत्याचे काँग्रेसशी बरोबरील नात्याच्याव वर्तुळ पूर्ण केले आहे.
हकालपट्टीपूर्वी डॉ. नवज्योत कौर यांनी एक खळबळजनक दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, "पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपद केवळ ५०० कोटी रुपये देणाऱ्यांनाच मिळते. आम्ही पंजाब आणि पंजाबियतबद्दल बोलतो, पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत." नंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना हा आरोप केवळ काँग्रेसवर नसून राजकारणातील भ्रष्टाचारावर असल्याचे म्हटले. मात्र, आता त्यांनी थेट राहुल गांधींना टीव्हीवर चर्चेचे आव्हान देत काँग्रेसमध्ये तिकिटांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
डॉ. नवज्योत कौर यांनी गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे खुलेआम कौतुक केले आहे. "भाजपनेच माझ्यातील कौशल्याची कदर केली होती," अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यामुळे हे दाम्पत्य पुन्हा भाजपमध्ये परतणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे, पंजाबमधील सत्ताधारी 'आप' (आम आदमी पार्टी) या वादापासून अंतर राखले असून, नवज्योतसिंग सिद्धू हे केवळ स्वार्थासाठी राजकारण करणारे 'स्थलांतरित पक्षी' असल्याची टीका केली आहे.
२०१७ मध्ये भाजपमधून बाहेर पडत सिद्धू दाम्पत्य काँग्रेसमध्ये दाखल झाले. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्या सरकारमध्ये सिद्धू मंत्री झाले, पण नंतर मतभेदांमुळे राजीनामा दिला. अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध बंड केल्यानंतर पक्षाने चन्नी यांना मुख्यमंत्री केले, ज्यानंतर काँग्रेसचा आणि सिद्धूंचाही दारुण पराभव झाला. यानंतर अपघात प्रकरणात सिद्धूंना एक वर्षाची शिक्षा भोगावी लागली. पंजाबमध्ये सध्या पंजाब काँग्रेसचे नेतृत्व राजा वारिंग यांच्याकडे आहे. डॉ. नवज्योत कौर यांनी वारिंग यांना 'सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम अध्यक्ष' संबोधले आहे, तर वारिंग यांनीही त्यांना 'मानसिक उपचारांची गरज' असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले आहे. तांत्रिकदृष्ट्या नवज्योतसिंग सिद्धू अजूनही काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांच्या पत्नीच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांचे काँग्रेसमधील भविष्य अंधारमय दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.