Astronaut Shubhanshu Shukla Aamras in space Moong dal Gajar halwa ISS Ax-4 Mission Axiom Space SpaceX Falcon 9
नवी दिल्ली : अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावणार आहे. शुभांशु शुक्ला असे त्यांचे नाव. त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेची वेळ जसजशी जवळ येईल तसतसे संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जात आहे.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला Axiom Space च्या Ax-4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत.
पण त्यांच्या या प्रवासात केवळ विज्ञान नाही, तर त्यांच्या घरातील आठवणी, प्रेम आणि चवही सोबत जात आहे ती त्यांच्या आईने बनवलेल्या खास जेवणाच्या डब्याच्या माध्यमातून. या डब्यातून आमरस आणि हलवा हे अस्सल भारतीय पदार्थ शुभांशू अंतराळात नेणार आहेत.
शुभांशू शुक्ला जो जेवणाचा डब्बा अंतराळात नेणार आहेत त्या खास डब्यात काही खास पदार्थ असणार आहेत. मलिहाबादच्या प्रसिद्ध दशहरी आंब्यांपासून बनवलेला 'आमरस' यात असणार आहे. जी शुभांशू यांची लहानपणापासूनची फेव्हरिट डिश आहे. हा आमरस शुभांशु यांची आई आशा शुक्ला यांनी स्वतः तयार केला आहे.
तसेच या डब्यात आहे मूग डाळीचा हलवा आहे. हा हलवा गायीच्या तुपात परतलेला असून त्याला वेलदोड्याचा सौम्य सुवास, आणि वरती बदामाचे काप टाकले आहेत. याशिवाय, गाजराचा हलवा सुद्धा दिलेला आहे. देशी लाल गाजर, दूध आणि खवा मंद आचेवर शिजवून तो तयार केला आहे.
या डब्यात बासमती भात देखील आहे, जो ISS वरील आंतरराष्ट्रीय फ्रीझ-ड्राइड करीसह खाता येईल.
लखनौमध्ये विज्ञान शिक्षिका असलेली त्यांची बहीण सुची शुक्ला म्हणाल्या की, "हे आंबे म्हणजे घराचा सुगंध आहे. डोळे बंद करूनसुद्धा हा सुगंध ओळखता येतो. आमरसात काही जास्त मसाले नाहीत, आईने फक्त थोडं वेलदोडं घातलं आहेत. शुभांशुला तसंच आवडतं."
गोपनीयतेच्या कारणामुळे शुभांशू त्यांच्या सर्व वैयक्तिक वस्तू सांगू शकत नाहीत, परंतु कुटुंबाला विश्वास आहे की काही फोटो आणि हाताने लिहिलेल्या चिठ्ठ्या त्यांनी डब्यात ठेवल्या असतील. "तो आम्हाला सांगत नाही, पण मला माहित आहे तो काहीतरी आमचं घेऊन जाणारच आहे," असं सुची म्हणते.
मोहिमेची वेळ जवळ येईल तशी राजाजीपूरम, लखनौ येथील शुक्ला कुटुंबीयांचे घर आनंदाचे ठिकाण बनून गेले आहे. शुभांशूंची मोठी बहीण नोएडाहून घरी आली आहे. नुकतेच त्यांच्या घरात ‘सत्यनारायण’ व ‘हवन’ करण्यात आल्याचे समजते. शुभेच्छा देण्यासाठी शेजाऱ्यांचा सतत राबता सुरूच आहे.
शुभांशूची आई आशा शुक्ला म्हणतात, "तो अनेक वर्षांपासून घरीच नीच जेवलेला नाही. गेल्या वर्षी घरी आला तेव्हा त्याच्यासाठी मी हलवा केला होता. आल्या आल्या त्याने तेच मागितले होते. संपूर्ण जग या मोहिमेचा आनंद घेईल, पण मला फक्त माझा मुलगा सुखरूप परत यावा, एवढंच पाहिजे."
शुभांशू यांचे वडील, निवृत्त सरकारी अधिकारी शंभूदयाल शुक्ला म्हणतात, "आधी शाळेत, मग NDA ला जाताना आम्ही शुभांशुला डबा द्यायचो. आता हा शेवटचा आणि सर्वात मोठा डबा आहे. आता अंतराळात जात आहे."
NASA आणि Axiom च्या अन्न सुरक्षेच्या नियमांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत शुद्ध, निर्जंतुक व व्हॅक्युम-सील स्वरूपात प्रक्रिया करून हा आमरस आणि इतर अन्नपदार्थ तयार केले जात आहेत. अन्न यथायोग्य पद्धतीने ISRO च्या अन्नविज्ञान विभागाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.
जगभरात अंतराळवीर आपल्या देशातील खास पदार्थ अवकाशात नेत असतात. जसे जपानी मिसो सूप, रशियन बर्श्च, मेक्सिकन टॉर्टिया यापुर्वी अंतराळात नेले गेले आहे.
तसेच, आता भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा डबा लखनौची अस्सल भारतीय चव आणि भारतीय संस्कृतीचा सुगंध ISS पर्यंत घेऊन जात आहे.
शुभांशू 9 जून रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:52 वाजता IST साठी Kennedy Space Center, Florida येथून SpaceX च्या Falcon 9 रॉकेटद्वारे अवकाशात झेप घेणार आहेत. त्यांच्यासोबत हंगेरी, पोलंड आणि अमेरिका येथील अंतराळवीरही असतील.
1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात गेले होते. आता, शुभांशू शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत.