Ajit Doval on operation sindoor
चेन्नई : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर वरून परदेशी माध्यमांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयआयटी मद्रासच्या 62व्या पदवीदान समारंभात बोलताना डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये तंत्रज्ञान, अचूकता आणि भारतीय क्षमतेचे मोठ्या अभिमानाने वर्णन केले.
डोवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताच्या कुठल्याही भागात नुकसान झाल्याचा एक ठोस पुरावा दाखवा, अशी थेट मागणी त्यांनी परदेशी माध्यमांकडे केली. "एक फोटो दाखवा — अगदी एक काचेचा तुकडा जरी फुटलेला दाखवला तरी बघू,” असे म्हणत त्यांनी परदेशी माध्यमांच्या दाव्यांवर टीका केली.
ऑपरेशन संदर्भात बोलताना NSA डोवाल म्हणाले, "23 मिनिटांत 9 लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आले आणि ते देखील सीमावर्ती भागांपासून दूर, पाकिस्तानच्या अंतर्गत भागात. सगळी लक्ष्ये हिट केली गेली, कुठेही चुकून हल्ला झाला नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला.
त्यांनी परदेशी माध्यमांवरही निशाणा साधला. “न्यूयॉर्क टाईम्सने जे काही लिहिलं, त्यांनी काही उपग्रह छायाचित्रं दाखवली, ती सुद्धा पाकिस्तानातील 13 एअर बेसची होती. मग भारतात काय नुकसान झालं याचा पुरावा कुठे आहे?” असा सवाल डोवाल यांनी उपस्थित केला.
डोवाल यांनी यावेळी ऑपरेशनसाठी वापरलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचेही विशेष कौतुक केले. “आपण वापरलेली यंत्रणा पूर्णतः भारतीय होती, आणि हे एक मोठे यश आहे,” असं ते म्हणाले.
7 मे 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पाक समर्थित दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला केला.
या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूर येथील मुख्यालय तसेच लष्कर-ए-तोयबाचा मुरिदके येथील तळ नष्ट केला गेला. तसेच पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील (PoK) ठिकाणांवरही हल्ले करण्यात आले.
पाकिस्तानकडून नंतर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतीय वायु संरक्षण प्रणालीने सर्व हल्ले अयशस्वी केले.
यानंतर भारताने 11 पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले करून मोठा संदेश दिला. हे ऑपरेशन आधुनिक भारताच्या लष्करी क्षमतेचा एक निर्णायक टप्पा मानला जातो.
अजित डोवाल यांनी या भाषणातून भारताच्या स्वसंरक्षण क्षमतेचा आत्मविश्वास दाखवताना परदेशी माध्यमांच्या पक्षपाती वृत्तीचा खरपूस समाचार घेतला. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैनिकी कारवाई नव्हते, तर भारतीय तंत्रज्ञान, नियोजन आणि अचूकतेचा जागतिक स्तरावरचा परिचय होते, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.