नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या काळातील ऐतिहासिक घटनांची अनुभूती उत्तर भारतातील आणि राजधानी दिल्लीतील तरुणांना आणि नागरिकांना घेता आली पाहिजे. यासाठी दिल्लीतील कुतुब इन्स्टिट्यूशनल भागामध्ये आधुनिक पद्धतीचे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लवकरच या संग्रहालयाचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर नागरिकांसाठी हे संग्रहालय खुले केले जाईल.
छत्रपती शिवाजी मेमोरियल राष्ट्रीय समितीच्या वतीने दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष विजय पाटील, महासचिव सेवानिवृत्त कर्नल मोहन काक्तीकर, मिलिंद पाटील, संजय दाबके यांनी संग्रहालयासंबंधी माहिती दिली.. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. दरम्यान, राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे संग्रहालय असावे, असा समितीचा मानस होता. त्याप्रमाणे वर्ष २०२० पासून यावर काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे संग्रहालय उभारण्यात येत असल्याचे निवृत्त कर्नल मोहन काक्तीकर यांनी सांगितले.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमांचा वापर
- संग्रहालयाच्या सुरुवातीला शिवपूर्वकालीन इतिहासावरील ७ मिनिटांची ७-डी दृकश्राव्य चित्रफीत अनुभवता येणार
- त्यानंतर दुर्गराज रायगडावरील चित्रफीतीच्या माध्यमातून शिवकालीन जीवनाचा अनुभव घेता येईल
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भवानी तलवारी, भाले, चिलखत इत्यादी शस्त्रांची प्रतिकृती
- सुरतेवरील स्वारी, शाहिस्तेखानावरील स्ट्राईक, अफजलखानाचा वध, इत्यादी प्रसंगाचा अनुभव नागरिकांना घेता येईल.
- संग्रहालयात काही भागांमध्ये १३डी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- डार्क राईडच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना पाहता येणार आहेत.