Sheikh Hasina return to Bangladesh File Photo
राष्ट्रीय

Sheikh Hasina : " ते माझा जीवही घेऊ शकतात ..." : शेख हसीना डिसेंबरमध्‍ये बांगलादेशला परतणार

माझ्याविरुद्धची कायदेशीर कारवाई बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय हेतूने प्रेरित

पुढारी वृत्तसेवा

Sheikh Hasina return to Bangladesh : "मला माहित आहे की ते मला तुरुंगात टाकू शकतात किंवा माझा जीवही घेऊ शकतात, तरीही मी डिसेंबर महिन्‍यामध्ये बांगलादेशला परत जाईन. माझ्यासाठी लोकांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे. फाशीची शिक्षा, खोटे आरोप आणि बनावट खटले मला घाबरवू शकत नाहीत. माझ्याविरुद्धची कायदेशीर कारवाई बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे," अशा शब्‍दांमध्‍ये बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपली पुढील वाटचाल स्‍पष्‍ट केली.

भारतातील आश्रयाला झाली दोन वर्ष पूर्ण

५ ऑगस्‍ट २०२४ रोजी बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपली सत्ता सोडून भारतात यावे लागले होते. त्यानंतर त्या सार्वजनिक व्यासपीठावर दिसल्या नव्हत्या. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शेख हसीना यांनी दिल्लीतून एका पत्रपरिषदेला संबोधित केले. यावेळी बांगलादेश अवामी लीगचे अनेक ज्येष्ठ नेते, त्यांचे पुत्र जॉय आणि माजी क्रिकेटपटू व नेते शाकिब अल हसन हेदेखील ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. शेख हसीना स्वतः ऑडिओ कॉलद्वारे या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

बांगलादेशला परतण्‍याची निश्‍चित तारीख लवकरच जाहीर करणार

शेख हसीना म्हणाल्या, "मी बांगलादेशात परतणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याची निश्चित तारीख आणि वेळ मी लवकरच घोषित करेन. बांगलादेशातील जनतेने खूप सोसले आहे. डिसेंबर महिना हा आपल्या विजयाचा महिना आहे, म्हणूनच मला डिसेंबरमध्येच परत जायचे आहे. आज बांगलादेशाला संवैधानिक बदलाची आणि न्यायाची गरज आहे. तिथे निवडणुका झाल्या तरी आजही लोकांच्या हत्या का होत आहेत? त्यांनी आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या सर्व खुणा मिटवून टाकल्या आहेत. आपल्याला आपला स्वाभिमान परत मिळवायचा आहे."८० च्या दशकातील प्रसंगाची आठवण करून देत अपदस्थ पंतप्रधान म्हणाल्या, "१९८१ मध्ये जियाउर रहमान यांनी मला बांगलादेशात येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मला थांबवू शकले नाहीत. आताही मला कोणी रोखू शकत नाही."

'भारत सरकारचे मानले आभार'

शेख हसीना यांचे पुत्र जॉय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना भारत सरकारचे आभार मानले. "सत्ता गेल्यानंतरही भारत सरकार शेख हसीना यांच्याशी राष्ट्रप्रमुखासारखाच सन्मानजनक व्यवहार करत आहे," असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आभार मानले.

मुहम्मद युनूस यांच्या सरकारवर निशाणा

युनूस यांच्या अवैध अंतरीम सरकारने पोलिसांच्या हत्या करणाऱ्यांना उघडपणे संरक्षण दिले आहे. आम्ही या हत्यांची चौकशी सुरू केली होती, पण युनूस सरकारने ती थांबवली. जर ते घाबरलेले नव्हते, तर त्यांनी सत्य समोर का येऊ दिले नाही? आज बांगलादेशात अल्पसंख्याक, न्यायाधीश, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती आणि रिक्षाचालकांनाही लक्ष्य केले जात आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या बाजूने उभे राहणाऱ्यांवर हल्ले होत असून, दोषी ठरलेल्या उग्रवाद्यांची तुरुंगातून सुटका केली जात आहे, असेही शेखर हसिना म्‍हणाल्‍या.

शेख हसीना यांना अश्रू झाले अनावर

आंदोलनकर्त्यांनी ४५० हून अधिक पोलीस ठाण्यांना आग लावली, पोलीस कर्मचारी जिवंत जळाले. सरकारी इमारतींवर हल्ले झाले. हे विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन नव्हते. सुधारणांच्या नावाखाली काही संघटित गटांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा हिंसक राजकीय शस्त्रासारखा वापर केला.गेल्या दोन वर्षांत मी माझ्या लाडक्या बांगलादेशाची दुर्दशा पाहिली आहे. १९७१ मध्ये ३० लाख लोकांनी ज्या देशासाठी बलिदान दिले, हा तो बांगलादेश उरलेला नाही," असे सांगताना शेख हसीना यांना अश्रू अनावर झाले.

'बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनलाय'

शेख हसीना यांचे पुत्र जॉय यांनी इशारा दिला की, "बांगलादेश हा आता नवा पाकिस्तान बनला आहे. बांगलादेशातील हा राजकीय बदल भारतासाठी अत्यंत चिंतेची बाब असून भारताने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT