Shehzad Poonawalla BJP Resignation: भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे राजीनामा सादर केला असून, त्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप ना भाजपकडून, ना शहजाद पूनावाला यांनी अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
पूनावाला यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील प्रोफाइलमधील बदलामुळे राजीनाम्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यांनी आपल्या बायोमधून 'भारतीय जनता पार्टी' हा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होत आहे. मात्र, त्यांनी अद्यापही आपल्या बायोमध्ये "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनुयायी" असा उल्लेख कायम ठेवला आहे.
शहजाद पूनावाला यांच्या अपडेट केलेल्या बायोमध्ये त्यांनी स्वतःची ओळख पुढीलप्रमाणे दिली आहे, "धर्म – इस्लाम, संस्कृती – हिंदू, विचारधारा – भारतीय. 'GST की यात्रा' या पुस्तकाचे लेखक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनुयायी." या बायोमध्ये भाजपचा थेट उल्लेख नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, शहजाद पूनावाला यांनी पक्ष नेतृत्वाला पाठवलेल्या राजीनाम्यात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्या निर्णयामागे नेमके कारण काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भाजपकडूनही याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
शहजाद पूनावाला यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर त्यांनी टीका केली होती.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आणि त्यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये भाजपची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
सध्या शहजाद पूनावाला यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू असल्या तरी, भाजप किंवा पूनावाला यांच्याकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील काही तासांत याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.