sharda university student death
ग्रेटर नोएडा: येथील प्रसिद्ध शारदा विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बनावट सहीच्या आरोपावरून प्राध्यापकांनी वर्गात सर्वांसमोर अपमानित केल्याने आणि परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याने आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी विद्यापीठाबाहेर जोरदार आंदोलन केले, ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
पोलिसांनी या प्रकरणी विद्यापीठातील पाच कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
18 जुलै रोजी शारदा विद्यापीठात बीडीएस (BDS) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात आठवडाभरापूर्वी झाली होती. एका प्राध्यापकाने त्याच्या बहिणीवर असाइनमेंट आणि लॅबच्या कामावर बनावट सह्या केल्याचा आरोप केला होता.
पीडीतेचा भाऊ म्हणाला की, "माझे वडील सोमवारी कॅम्पसमध्ये आले होते आणि त्यांनी संबंधित प्राध्यापक आणि विभागप्रमुखांशी (HOD) चर्चा केली होती. गुरुवारी सकाळीही त्यांचे माझ्या बहिणीशी बोलणे झाले. त्यानंतर तिचा काहीच संपर्क झाला नाही.
नंतर तिच्या वर्गमित्रांकडून आम्हाला कळले की, तिला वर्गात सर्वांसमोर अपमानित करण्यात आले.
'ती बनावट सह्या करण्यात पटाईत आहे' असे म्हणून तिला परीक्षेत नापास करण्याची धमकीही शिक्षकांनी दिली होती," असे तिच्या भावाने सांगितले. या सततच्या मानसिक दबावामुळेच तिने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
आपल्या मुलीला न्याय मिळावा, या मागणीसाठी पीडितेच्या आईने गुरुवारी रात्रभर विद्यापीठाच्या आवारात बसून आंदोलन केले. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. "मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींना इथे बोलवा. मी रात्री 9 वाजल्यापासून इथे बसले आहे.
माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत मी इथून हटणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, मला जाळून टाका, पण मी ही जागा सोडणार नाही," असा टाहो त्यांनी फोडला.
यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थी आणि कुटुंबीयांवर लाठीचार्ज केल्याचा आरोपही त्यांनी केला. "आता सर्व बीडीएसचे विद्यार्थी घाबरले आहेत आणि त्यांना फक्त घरी जायचे आहे," असेही त्या म्हणाल्या.
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, "या प्रकरणी 5 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य प्रक्रिया राबवण्याचे निर्देश आम्ही विद्यापीठ प्रशासनाला दिले आहेत."
विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीय आणि शारदा विद्यापीठ प्रशासनामध्ये बैठक घडवून आणली. "सध्या विद्यापीठातील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पुढील तपास सुरू आहे," असेही कुमार यांनी स्पष्ट केले.