

Sher AK-203 rifle in Indian Army Amethi factory production
लखनौ : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) या संयुक्त प्रकल्पातून तयार होणाऱ्या अत्याधुनिक AK-203 रायफल्स लवकरच संपूर्णपणे स्वदेशी बनणार आहेत. याच वर्षअखेरीस भारतीय लष्कराच्या ताफ्यात एकूण 70000 AK-203 रायफल्स असतील, अशी अधिकृत माहिती आहे.
IRRPL मधील उत्पादनात सध्या सुमारे 50 टक्के स्वदेशीकरण गाठले असून, 2025 च्या अखेरीस 100 टक्के स्वदेशी उत्पादन होणार आहे. पूर्णपणे स्वदेशी बनल्यानंतर या रायफलचे नाव ‘शेर’ ठेवले जाणार आहे.
IRRPL चे अध्यक्ष मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी सांगितले की, “एकूण 601427 AK-203 रायफल्स तयार करण्याचा करार संरक्षण मंत्रालयाशी झाला आहे. यातील सुरुवातीची दोन वर्षे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी राखीव होती. 2025 नंतर दरवर्षी 70000 रायफल्स उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे.”
आजअखेर 48000 रायफल्स भारतीय लष्कराला पुरवण्यात आल्या असून, 15 ऑगस्टपूर्वी आणखी 7000 रायफल्स दिल्या जातील. वर्षअखेरीस एकूण 70000 रायफल्स भारतीय लष्करात कार्यरत असतील.
गोळ्यांचा प्रकार: 7.62x39 मिमी
फायरिंग मोड: ऑटोमॅटिक (प्रति मिनिट 700 गोळ्या) व सिंगल-शॉट
लांबी: फोल्डिंग बटसह सुलभ वाहतूकयोग्य
अॅक्सेसरी स्लॉट्स: पिकाटिनी रेल्स, अंडर-बॅरल ग्रेनेड लॉन्चर
वजन: फक्त 3.6 किलोग्रॅम
कार्यक्षमता: 800 मीटर पर्यंत मारा, प्रत्यक्ष युद्धासाठी 350 मीटर श्रेणी
या रायफल्सने कार्यक्षमतेत कोणतीही अडचण न देता उत्तम कामगिरी बजावली आहे. प्रत्येक रायफलवर 120 पेक्षा अधिक गुणवत्ता निकषांवर परीक्षण होते आणि 63 गोळ्यांच्या चाचणीतून ती पार पडते.
मेजर जनरल शर्मा पुढे सांगतात, “आम्ही 2032 पूर्वी संपूर्ण डिलिव्हरी पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे, पण मला खात्री आहे की हे कार्य 2030 पर्यंत पूर्ण होईल. इतर अनेक सुरक्षा यंत्रणा आणि काही इतर देशांकडून देखील या रायफल्सबाबत मागणी आली आहे.
आम्ही या मागण्या योग्य प्रकारे तपासून, भारत व रशियासोबत मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांना रायफल्स पुरवण्याचा विचार करत आहोत.”
सध्या या रायफल्स एलएसी (Line of Actual Control) व एलओसी (Line of Control) वर कार्यरत जवानांकडे आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, लवकरच AK-203 रायफल्स भारतीय लष्करातील मुख्य युद्ध शस्त्र बनतील.