NCP Sharad Pawar | इंडिया आघाडीच्या बैठकीपासून शरद पवारांची राष्ट्रवादी दूर, पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातही स्वाक्षरी नाही file photo
राष्ट्रीय

NCP Sharad Pawar | इंडिया आघाडीच्या बैठकीपासून शरद पवारांची राष्ट्रवादी दूर, पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातही स्वाक्षरी नाही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेंला उधाण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्वाची बैठक दिल्लीत मंगळवारी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अनुपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तूळात सुरू असताना ही बैठक पार पडली. त्यामुळे राजकीय वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली.

इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटना लक्षात घेऊन संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणत्याही नेत्याची किंवा खासदाराची स्वाक्षरी नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळात परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्वतः विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, असे असूनही या पत्रावर त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याची स्वाक्षरी नसणे हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय बनले आहे, हे उल्लेखनीय!

पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आदी १६ पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे अभिषेक बॅनर्जी हे परदेशात असतानाही त्यांची पत्रावर सही आहे. याचीही चांगलीत चर्चा दिल्लीत आहे. दरम्यान, गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, शरद पवार गटाची भूमिका नक्की काय असेल, याबाबतही अनेक तर्क बांधले जात आहेत.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर इंडिया आघाडी अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत मोठ्या कालावधीनंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यामुळे विरोधक एकत्र आहेत, हा संदेशही आघाडीला या निमित्ताने द्यायचा होता मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे विरोधकांच्या या प्रयत्नाला खीळ बसल्याचे चित्र होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT