Serial Killer Dr. Death devendra sharma arrested
नवी दिल्ली: "डॉक्टर डेथ" म्हणून कुप्रसिद्ध असलेला एक क्रूर सिरीयल किलर देवेंद्र शर्मा याला दिल्ली पोलिसांनी राजस्थानातील दौसा येथील एका आश्रमातून अटक केली आहे. तो आश्रमात खोट्या नावाने पुजारी म्हणून राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या क्रूर नराधमाने अनेक खून केले आणि खून केलेले मृतदेह त्याने मगरींचा अधिवास असलेल्या कालव्यात टाकले होते.
67 वर्षीय देवेंद्र शर्मा हा मूळचा एक आयुर्वेदिक डॉक्टर. अनेक खुनांच्या गुन्ह्यांमध्ये तो दोषी ठरला आहे. उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील हजारा कालवा हा मगरींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे तो खून केलेले मृतदेह टाकून पुरावे नष्ट करायचा.
शर्माने दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये एकूण सात खून केले होते. या खटल्यांतून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर गुरुग्राम न्यायालयाने त्याला एका प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे.
दिल्ली पोलिस गुन्हे शाखेचे उपायुक्त आदित्य गौतम यांनी सांगितले की, शर्मा हा BAMS (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) पदवीधारक असून 2002 ते 2004 दरम्यान अनेक टॅक्सी आणि ट्रक चालकांचे खून केले.
त्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आणि त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट 2023 मध्ये त्याने पॅरोलवर सुटल्यावर तो तुरुंगात परतलाच नाही.
"शर्मा आणि त्याचे साथीदार बनावट ट्रिप्सच्या निमित्ताने चालकांना बोलवून त्यांची हत्या करत आणि त्यांच्या वाहनांना ग्रे मार्केटमध्ये विकत. प्रेतं हजारा कालव्यात टाकून पुरावे नष्ट करत," असे डीसीपी गौतम यांनी सांगितले.
शर्माचा गुन्हेगारी इतिहास अतिशय भयानक असून त्याच्यावर 27 हून अधिक खून, अपहरण आणि दरोड्यांचे गुन्हे दाखल आहेत.
त्याने 1998 ते 2004 या काळात अवैध मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट चालवले होते. त्याने विविध राज्यांतील डॉक्टर व दलालांच्या मदतीने 125 हून अधिक बेकायदेशीर किडनी ट्रान्सप्लांट घडवून आणल्याचे कबूल केले आहे.
त्याला 1994 मध्ये गॅस एजन्सीच्या व्यवहारात आर्थिक नुकसान झाले होते. नंतर एका बनावट गॅस एजन्सीद्वारे त्याने लोकांची फसवणूक सुरू केली. पुढे त्याने अवैध अवयव व्यापारात प्रवेश केला आणि शेवटी टॅक्सी चालकांच्या खुनाकडे तो वळला.
शर्मा याला 2004 मध्ये मूत्रपिंड रॅकेट आणि सिरीयल किलिंग प्रकरणात अटक करण्यात आले होते. तिहार तुरुंगात असताना त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते, मात्र ऑगस्ट 2023 मध्ये तो परतलाच नाही.
त्याच्या शोधासाठी पोलिसांनी अलिगढ, जयपूर, दिल्ली, आग्रा आणि प्रयागराज अशा अनेक शहरांमध्ये सहा महिने मोहीम राबवली आणि शेवटी तो दौसा येथील एका आश्रमात पुजारी बनून लपल्याचे उघड झाले.
ही पहिली वेळ नाही की शर्मा पॅरोलवरून पळून गेला. 2020 मध्येही तो 20 दिवसांच्या पॅरोलवर सुटला होता पण सात महिने पसार होता, आणि शेवटी दिल्लीमध्ये पकडला गेला होता. जून 2023 मध्येही त्याला दोन महिन्यांसाठी तुरूंगातून पॅरोल मिळाला होता, पण तो 3 ऑगस्ट 2023 नंतर बेपत्ता झाला.