रायपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील कोतवाली येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय ६५) यांनी पत्नी नांदणी (५५) आणि दोन मुलांसह विष घेऊन आत्महत्या केली आहे. सूरज यादव (२७) आणि नीरज यादव (३२) अशी या दाम्पत्याच्या मुलांची नावे आहेत.
(Suicide Case)
आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. पंचराम हे कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून ४० लाखांचे कर्ज घेतले होते.
त्यांना हृदयाशी निगडित आजार होता. त्यांची पत्नी नांदणी कर्करोगाशी झुंज देत होत्या. मुलगा नीरज खासगी कंपनीत नोकरी करत होता, तर दुसरा मुलगा सूरज कंत्राटे घेत होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याची माहिती कुणाला मिळू नये याची काळजी या कुटुंबाने घेतली होती. कुटुंबीयांनी घराच्या बाजूला असलेली दोन्ही गेटस् बंद केली होती. चौघांनीही विष घेतल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुरुवातीला यादव यांचा थोरला मुलगा आणि त्यानंतर मग अन्य तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.