Vijay Shah Case : 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांना आज (दि.२८) दिलासा मिळाला. त्यांच्या अटकेला स्थगिती देण्याच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात प्रलंबित कार्यवाही देखील बंद करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आजच्या सुनावणीत मध्य प्रदेशी पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या स्थिती अहवालाची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. अधिक कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तपास अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माध्यमांना माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध वादग्रस्त टिप्पणी केली होती. याची गंभीर दखल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घेतली. गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. यानुसार, विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या कारवाईविरोधात शाह यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अटकेला स्थगिती देण्याच्या अंतरिम आदेशाला मुदतवाढ दिली आहे.
"तुम्ही एक सार्वजनिक व्यक्ती आहात, एक अनुभवी राजकारणी आहात. त्यामुळं तुम्ही बोलताना तुमचे शब्द तोलले पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारची बेजबाबदारपणे केलेली टिप्पणी पूर्णपणे अविचारी होती. आम्हाला तुमची माफी मागण्याची आवश्यकता नाही. कायद्यानुसार कसे वागायचे हे आम्हाला माहिती आहे. तुमचा माफीनामा हा केवळ कायदेशीर जबाबदारीपासून पळ काढण्यासाठी आहे. आम्ही तो स्वीकारणार नाही, अशा शब्दांमध्ये १९ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने कुंवर विजय शाह यांना फटकारले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी एसआयटी स्थापन करावी, असे आदेशही न्या. सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने दिला होता.