CJP Delhi protest
नवी दिल्ली: 'देशात गेल्या ७२ तासांपासून १९७५ च्या आणीबाणी सारखी परिस्थीती निर्माण झाली असून 'हुकूमशाह' मोदींनी आणीबाणीच्या काळातील घटनांनाही मागे टाकले आहे. सरकारचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले असून स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारत आहे,' असा हल्लाबोल सीजेपीने केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) फोडलेल्या डरकाळीने गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली अक्षरशः हादरली आहे. पोलिसांनी आंदोलक व त्यांच्या नेत्यांची धरपकड करीत शेकडो जणांना ताब्यात घेतले. 'सीजेपी'चे प्रमुख अभिजित दीपके व त्यांचे सहकारी सौरव दास, आशुतोष रांका यांना दिल्लीत दाखल होताच विमानातच ताब्यात घेतले होते. आज न्यायालयाने त्यांची काही अटींसह सुटका केली. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जहरी टीका केली.
यावेळी आशुतोष रांका म्हणाले की, "मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपला निवडणुका जिंकण्यास मदत करण्यासाठी काम करत आहेत. गेल्या ७२ तासांत देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यांची कोणीही कल्पना केली नसेल. सीजेपीचा लढा हा निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आहे. देशाचे रक्षण आणि प्रगती करण्याची जबाबदारी असलेल्या या निवडणूक आयोगाने आपली भूमिकाच धोक्यात आणली आहे," असा आरोप रांका यांनी केला.
दिल्लीत आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना रांका म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या ७२ तासांत आणीबाणीच्या काळातील घटनांनाही मागे टाकले आहे. पंतप्रधान मोदींचे वर्णन 'हुकूमशाह' असे करत त्यांनी निदर्शनांशी संबंधित पोलीस कारवाई व अटकेच्या घटनांवर टीका केली.
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अटकेच्या घटनांवरून, 'सीजेपी'ने सरकारवर नागरिकांशी युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे. पक्षाने आंदोलकांवरील कारवाईवर टीका करत ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली. सीजेपी नेते सौरव दास म्हणाले की, देशात १९७५ मधील परिस्थितीसारखीच आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. सरकार देशाला गृहयुद्धासारख्या परिस्थितीकडे ढकलत असून स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारत आहे", असा आरोपही त्यांनी केला.
"सरकारचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले असून त्याचा अंत जवळ आला आहे, असा दावा सीजेपी सदस्य सौरव दास यांनी केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप करत, दास यांनी त्यांना देशविरोधी म्हटले.