Viral video Satyam Pandit
नवी दिल्ली: केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'ने देखील आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आहे. सरकारने त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य केल्याचे सीजेपीने सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हिंदुत्ववादी नेते सत्यम पंडित हे जंतरमंतरच्या दिशेने जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. अखिलेश यादव, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्टद्वारे भाजप सरकारवर टीका केली आहे.
अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, भाजप आणि त्यांच्या साथीदारांकडून केली जाणारी गैरवर्तणूक, शिवराळ भाषा आणि हिंसाचार सर्वांनी पाहिला पाहिजे. त्यांची हिंमत पहा, तरुणांना आश्वासने देऊन काही तास उलटले नाहीत तोच, आपल्या इतिहासाला साजेसे असे हे भाजप सदस्य पुन्हा एकदा त्यांचा विश्वासघात करत आहेत. हा सुसंस्कृत भाजप नेता आपल्याच वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांचे उघडपणे उल्लंघन करत आहे आणि त्याचे व्हिडिओही रेकॉर्ड करत आहे. 'डबल-इंजिन' सरकारमधील अंतर्गत संघर्षामुळे हे घडत आहे का? त्याला त्वरित अटक झाली पाहिजे, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "राष्ट्रीय हिंदू वीर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यम पंडित यांनी आंदोलनावरून परतत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. व्हिडिओ बघा आणि लक्षात ठेवा की हीच लोक भाजपला बुडवणार आहेत या देशात."
सत्यम पंडित स्वतःची ओळख 'हिंदू वीर सेना'चा अध्यक्ष म्हणून सांगतो. बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२६ मध्ये, मांस विक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी करत असताना त्याने मांस विक्रेत्यांवर हल्ला केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.