Salman Khan CJP Protest Pudhari
राष्ट्रीय

Salman Khan: 'विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा'; NEET पेपर लीक आणि CJP आंदोलनावर सलमान खान पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलला

Salman Khan CJP Protest: NEET पेपर लीक आणि CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानने प्रथमच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Salman Khan CJP Protest: NEET पेपर लीकच्या आरोपांनंतर आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात चर्चा सुरू असतानाच, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने प्रथमच या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमधून त्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, सलमान खानने याबाबत मौन बाळगल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत होती. अखेर त्याने यावर सविस्तर भूमिका मांडली.

'आंदोलन शांततेत सुरू झाले, हिंसा दुर्दैवी'

सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, हे आंदोलन सुरुवातीला पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला हिंसक वळण लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती त्याने सहवेदना व्यक्त केली.

त्याने NEET पेपर लीकचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, देशातील विद्यार्थी चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आले आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचे त्याने सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी दिलेल्या पाठिंब्याचेही त्याने कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक

सलमानने आपल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. स्वतःचे भविष्य घडवण्याबरोबरच अधिक सक्षम आणि सुशिक्षित भारत घडवण्याची त्यांची इच्छा प्रेरणादायी असल्याचे तो म्हणाला. त्याच्या मते, विद्यार्थ्यांनी आंदोलन लोकशाही मार्गाने आणि शांततेत करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे धैर्य आणि शिक्षणाबद्दलची बांधिलकी देशासाठी महत्त्वाची आहे.

'या प्रश्नाला राजकीय रंग देऊ नये'

सलमान खानने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय स्वरूप देणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. हा प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असल्याने त्याचे श्रेय केवळ विद्यार्थ्यांनाच मिळायला हवे, असे त्याने म्हटले.

सरकार विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेईल आणि शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्णय घेईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या.

'भारत शिक्षणाचे जागतिक केंद्र व्हावे'

आपल्या पोस्टच्या शेवटी सलमान खानने शिक्षणाला समाजात सर्वोच्च प्राधान्य मिळायला हवे, असे नमूद केले. शिक्षण हा पुढील काळातील सर्वात मोठा ट्रेंड ठरावा, तसेच भारत जगभरातील विद्यार्थ्यांसाठी आकर्षक शिक्षण केंद्र म्हणून विकसित व्हावं, अशी त्याने इच्छा व्यक्त केली.

अनेक कलाकारांचा आंदोलनाला पाठिंबा

सलमान खानव्यतिरिक्त अभिनेत्री झीनत अमान, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री शबाना आझमी, रत्ना पाठक शाह, अभिनेता अभय देओल, ओमी वैद्य यांच्यासह अनेक मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी CJP नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, CJP च्या प्रवक्त्यांनी जंतर-मंतर येथे आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत असल्याचा दावा केला असून, सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन आणखी व्यापक होईल, असा इशाराही दिला आहे. दुसरीकडे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीत CRPF च्या अतिरिक्त 20 कंपन्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT