Sajjan Kumar passes away : १९८४ मध्ये दिल्लीत उसळलेल्या शीख विरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या सज्जन कुमार यांना शीख विरोधी दंगलीशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दिल्लीच्या जनकपुरी भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जानेवारी २०२६ मध्ये पुराव्यांअभावी त्यांची सुटका केली होती.
दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील पालम कॉलनी येथे ५ शिखांची हत्या करून गुरुद्वारा जाळल्याच्या प्रकरणात सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१८ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.सप्टेंबर २०२३ मध्ये राऊझ एव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीच्या सुलतानपुरी भागात ३ शिखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सीबीआयच्या (CBI) मुख्य साक्षीदार चाम कौर यांनी सज्जन कुमार जमावाला भडकावत असल्याचा आरोप केला होता.१ नोव्हेंबर १९८४ रोजी सरस्वती विहार येथे सरदार जसवत सिंह आणि त्यांचा मुलगा तरणदीप सिंह यांची लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कोर्टाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवले असून २५ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. होती यानंतर १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीसह देशाच्या विविध भागात शीखविरोधी दंगली भडकल्या होत्या. या दंगलीत दिल्लीत २,७०० तर देशभरात सुमारे ३,५०० लोकांचा मृत्यू झाला होता.
१९८४ च्या शीख दंगल प्रकरणाच्या तपासासाठी मे २०००मध्ये न्यायमूर्ती जी. टी. नानावटी आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
२४ ऑक्टोबर २००५ रोजी नानावटी आयोगाच्या शिफारशीनुसार सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
१ फेब्रुवारी २०१० ट्रायल कोर्टाकडून काँग्रेस नेते सज्जन कुमार, बलवान खोकर, महेंद्र यादव, कॅप्टन भागमल, गिरधारी लाल, किशन खोकर, महा सिंग आणि संतोष राणी यांना समन्स जारी.
३० एप्रिल २०१३ : न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली.
१९ जुलै २०१३: सीबीआयकडून या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील.
२२ जुलै २०१३: उच्च न्यायालयाकडून सज्जन कुमार यांना नोटीस बजावण्यात आली.
१७ डिसेंबर २०१८: उच्च न्यायालयाने ५ शिखांच्या हत्येप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
माफीनामा: दंगलीनंतर २१ वर्षांनी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत देशाची माफी मागितली. "१९८४ मध्ये जे घडले त्याने मान लाजेने झुकते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.