Vladimir Putin call to Narendra Modi give full support to India against terrorism
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. संपूर्ण जग भारत आता काय कारवाई करतोय, याकडे लक्ष ठेऊन आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी 5 मे रोजी स्वतःच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरून संपर्क साधला.
यावेळी चर्चेत दहशतवादविरोधी लढाईत रशिया भारताच्या पूर्ण पाठिशी असल्याचे पुतीन यांनी मोदींना सांगितले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र संबोधत मोदींनी दिलेले भारत दौऱ्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे, अशी माहिती क्रेमलिनने सोमवारी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर ही माहिती समोर आली.
पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना यंदा भारतात होणाऱ्या 23३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा ज्यापैकी बहुतांश पर्यटक होते त्यांचा बळी गेला होता.
पुतीन यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी शोक व्यक्त केला आणि भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात "पूर्ण पाठिंबा" देण्याचे आश्वासन दिले.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी ठामपणे सांगितले की, "या हल्ल्यामागील दोषींना आणि त्यांच्या समर्थकांना न्यायासमोर आणलेच पाहिजे." याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर केली.
या संवादादरम्यान, दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं की, भारत आणि रशियामधील संबंध कोणत्याही बाह्य दबावामुळे प्रभावित झालेले नाहीत आणि ते गतिमानपणे विकसित होत आहेत.
तसंच, दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया विशेष व विशेषाधिकारयुक्त धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली.
पंतप्रधान मोदी यांनी रशियाच्या विजय दिनाच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा दिल्या.
3 मे रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री एस. व्ही. लाव्हरोव आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात टेलिफोनवर संवाद झाला. या वेळी पाहलगामजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती देण्यात आली. लाव्हरोव यांनी दिल्ली-इस्लामाबाद दरम्यानचे मतभेद राजकीय आणि राजनैतिक मार्गानेच सोडवावेत, असं आवाहन केलं.
ही घोषणा अशा वेळेस आली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहलगाममधील बायसरन खोर्यात घडलेला हा हल्ला पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील स्थळी झाला होता. पुतीन यांच्या या प्रतिक्रियेने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वाचा पाठिंबा मिळाला आहे.
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर क्रेमलिनने सोमवारी भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव शमवण्याचे आवाहन केले आहे. "सीमेवर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आम्ही गंभीरतेने पाहत आहोत.
आम्ही आशा करतो की दोन्ही देश तणाव कमी करणारी पावले उचलतील," असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.