Republic Day security alert
हापूर: एका तरूणाने २० दिवसांपूर्वी भाड्याने घेतलेल्या घरातून २५० किलो स्फोटके उत्तर प्रदेश पोलिसांनी जप्त केली आहेत. प्रजासत्ताक दिनापूर्वी पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. पोलीसांनी राबवलेल्या 'ऑपरेशन सत्यापन' अंतर्गत हापूर येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
पोलीसांनी लाखो रुपये किमतीचे तयार तसेच अर्धवट तयार केलेले 'कँडल' (लग्नात वापरले जाणारे फटाके) यासह इतर साहित्य हस्तगत केले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नदीम असे नाव असून तो गाझियाबादमधील फरूखनगर येथील रहिवासी आहे.
पोलीस निरीक्षक मुनीष प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 'ऑपरेशन सत्यापन' अंतर्गत नवीन भाडेकरूंची तपासणी करण्यासाठी ते पथकासह कुचेसर चौपला येथील फतेहपूर गावात पोहोचले होते. यादरम्यान, राहुल खटीक यांच्या घरात बेकायदेशीरपणे फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'कँडल' तयार केल्या जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता तिथे एकच खळबळ उडाली.
घराची झडती घेतली असता तिथे अडीच क्विंटल ड्राय कॉटन पावडर आणि लाखो रुपये किमतीचे फटाके आढळले. नदीमची सध्या चौकशी सुरू आहे. ही पावडर लग्नसमारंभात वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या कांड्या बनवण्यासाठी वापरली जाते. हे साहित्य तयार करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही पावडर कुठून आणली, याचा तपास पोलीस करत आहेत.
तपासणीत असे समोर आले आहे की, नदीमने २० दिवसांपूर्वीच राहुल खटीक यांचे घर भाड्याने घेतले होते. राहुलने कोणत्या आधारावर नदीमला घर भाड्याने दिले, याचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.