Relationship : प्रेम हा एक असा विषय आहे, ज्यावर लोक नेहमी बोलणं पसंत करतात. यावर खूप चित्रपट येतात आणि पुस्तकंही लिहिली जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमाशी संबंधित काही चांगले आणि काही वाईट अनुभव असतात. ज्या लोकांना प्रेम होतं, ते अनेकदा म्हणतात की प्रेम ही एक प्रकारची नशा आहे, जी माणसाला आंधळं करते आणि त्याला दुसरं काही दिसत नाही.
आता वैज्ञानिकांनीही यावर संशोधन केलं आहे आणि सांगितलं आहे की, प्रेमामध्ये नेमकं असं काय होतं, ज्यामुळे व्यक्तीचं संपूर्ण वर्तन, विचार करण्याची पद्धत आणि भावना बदलते. प्रेम खरोखरच माणसाला आतून बदलतं, विज्ञान आता यामागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जाणून घेऊया काय आहे यामागचं कारण.
जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते, तेव्हा सर्वात आधी ती दुसऱ्या व्यक्तीला अत्यंत खास आणि वेगळं समजू लागते. प्रेमाची सुरुवात मेंदूसाठी एक तीव्र आणि खोल भावनांची स्थिती असते, जिथे आपल्या प्रतिक्रिया वाढतात आणि आतील वेड खूप वाढतं. प्रेमाच्या सुरुवातीला जे आकर्षण आणि इच्छा जाणवते, ती शरीरात तयार होणारे सेक्स हार्मोन्स इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन यांच्यामुळे होते.
हे हार्मोन्स आपल्याला त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची आणि त्याला मिळवण्याची इच्छा वाढवतात. जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा मेंदूचे काही खास भाग सक्रिय होतात, जसे की लिंबिक सिस्टिम आणि रिवॉर्ड सेंटर. लिंबिक सिस्टिम आपल्या भावना आणि आठवणी नियंत्रित करते. यामुळेच आपल्याला खूप आनंद होतो आणि नवीन प्रेमाशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी आठवण खूप खोल आणि खास वाटते. म्हणूनच प्रेमाची सुरुवात इतकी रोमांचक, आनंदी आणि अविस्मरणीय वाटते.
प्रेमाच्या सुरुवातीला शरीरात डोपामिन आणि नॉरएड्रेनालिन नावाचे केमिकल वाढतात. डोपामिन मेंदूमध्ये आनंदाची सिस्टिम सक्रिय करतं, ज्यामुळे त्या व्यक्तीबद्दल वारंवार विचार करण्याची इच्छा होते आणि त्याला मिळवण्याची ओढ वाढते. नॉरएड्रेनालिन आपल्याला खूप आनंदी आणि उत्साही बनवत. यामुळेच हृदयाचे ठोके वाढतात आणि ऊर्जाही वाढते. याच दरम्यान, मेंदूचे काही भाग कमी सक्रिय होतात, जसे की फ्रंटल कॉर्टेक्स, जो योग्य-अयोग्य विचार करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत करतो. जेव्हा हा भाग कमी काम करतो, तेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चुका दिसतच नाहीत. म्हणूनच म्हणतात की प्रेमाच्या सुरुवातीला माणूस आंधळा होतो. पण जिथे एका बाजूला हे सगळं छान वाटतं, तिथे सुरुवातीला कॉर्टिसोल म्हणजे तणावाचा हार्मोन देखील वाढतो. यामुळे बेचैनी, चिंता आणि "समोरच्यालाही मी तितकाच आवडतो का?" "हे नातं टिकेल का?" अशी भीतीही असते. म्हणजेच, प्रेमाची सुरुवात आनंद, उत्साह आणि रोमान्सने भरलेली असते, पण सोबत थोडा तणावही घेऊन येते.
प्रेमात पडणे आणि सुरुवातीच्या आकर्षणाची अवस्था साधारणपणे काही महिन्यांपर्यंत टिकते. यानंतर जवळिकीची भावना, विश्वास आणि बांधिलकी येते. हे आपल्या शरीरातील ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन या हार्मोन्समुळे होते. ऑक्सिटोसिन आपल्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटायला मदत करतं. व्हॅसोप्रेसिन आपल्याला सतर्क आणि आपल्या प्रेमाचं रक्षण करणारा बनवते. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिनमधील संतुलन हे सुनिश्चित करतं की आपण इतरांशी जोडले जावे, पण स्वतःचं आणि आपल्या प्रेमाचंही संरक्षण करावं. ऑक्सिटोसिनला अनेकदा प्रेमाचा हार्मोन म्हणतात कारण ते सामाजिक संबंध निर्माण करण्यात मदत करतं.
लैंगिक संबंध प्रेमापेक्षा वेगळे असले तरी, ते नातं अधिक मजबूत करतात. जेव्हा आपण स्पर्श करतो, चुंबन घेतो किंवा शारिरीक संबंध ठेवतो, तेव्हा ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन वाढतात, ज्यामुळे प्रेम आणि बांधिलकी वाढते. जवळीक आणि बांधिलकी हे प्रेम टिकवून ठेवण्यास मदत करते. काही नाती या काळात संपतात कारण वेड कमी होतं, तर काही जोडपी दशकांपर्यंत आपलं वेडेपणाचं प्रेम टिकवून ठेवतात.
रोमँटिक प्रेमाव्यतिरिक्त, ऑक्सिटोसिनचं महत्त्व नॉन-रोमँटिक प्रेमामध्येही आहे, जसे की कुटुंब, मित्र किंवा पाळीव प्राण्यांशी असलेलं प्रेम. चांगले आणि सकारात्मक नातेसंबंध आणि ऑक्सिटोसिन आपल्या आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी खूप फायदेशीर असतात. इकोनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, संशोधनात हे दिसून आलं आहे की ऑक्सिटोसिन लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास आणि त्यांचे सामाजिक संबंध मजबूत करण्यात मदत करतं.
तर, तुम्ही एखाद्या खास व्यक्तीवर, मित्रांवर किंवा पाळीव प्राण्यांवर प्रेम करत असाल, ते प्रेम कितीही लांब किंवा लहान असो, आणि तुम्ही किती वेळा प्रेमात पडला असाल, प्रेम करणे आणि प्रेम मिळवणे नेहमीच आनंददायक असते. प्रेम कदाचित निसर्गातील सर्वात उत्कृष्ट केमिकल आहे, परंतु त्याचं जटिल वर्तन अजूनही विज्ञानाच्या समजेपलीकडे आहे.