नवी दिल्ली : आईस्क्रीम आणि रेड वाईन एकत्र! ऐकून आश्चर्य वाटले ना? मात्र, सध्या सोशल मीडियावर हाच ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. वाईनच्या शौकिनांमध्ये 'रेड वाईन फ्लोट' म्हणून एक नवीन गोड आणि नशेदार ट्रेंड प्रसिद्ध झाला आहे. हा ट्रेंड कुठून आला आणि व्हायरल कॉम्बोची सोपी रेसिपी जाणून घ्या.
एका वाईन ग्लासमध्ये व्हॅनिला आईस्क्रीमचा एक किंवा दोन स्कूप्स घ्यायचे आणि त्यावर हळू हळू रेड वाईन ओतायची. गडद लाल रंगाची वाईन आईस्क्रीमवर ओतल्यावर हळू हळू वितळते आणि गुलाबी जांभळा रंगाचे एक आकर्षक मिष्टान्न पेय तयार होते. हा प्रयोग मात्र पूर्णपणे नवीन नाही. 'रेड वाईन फ्लोट' म्हणून हा ट्रेंड काही वर्षांपूर्वीही चर्चेत होता, पण सध्या याच्या रिल्स पुन्हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागल्या आणि तो पुन्हा चर्चेत आला.
रेड वाईन आणि आईसक्रीमचा हा कॉम्बो फक्त चवीपुरता मर्यादित नाही, तर त्याचं दृश्य सौंदर्यही विलक्षण आहे. लालसर वाईन जेव्हा पांढऱ्या आईसक्रीमवरून ओघळते तेव्हा गुलाबी-जांभळा रंग तयार होतो.
या ट्रेंडमध्ये आता सेलिब्रिटीही सामील झाले आहेत. नुकतेच, अभिनेत्री नौहीद सायरसी हिने तिच्या मैत्रिणीसोबत हा रेड वाईन फ्लोट करून पाहिला. तिने इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली, ज्यात त्या दोघींनी या अनोख्या प्रयोगाचा आनंद घेतल्याचे स्पष्ट दिसते.
हे बनवणं अगदी सोपं आहे.
साहित्य: व्हॅनिला आईसक्रीम आणि रेड वाईन.
कृती:
वाईन ग्लासमध्ये आईसक्रीमचा एक-दोन स्कूप ठेवा.
हळूहळू रेड वाईन ओता, जेणेकरून आईसक्रीम तरंगेल आणि थोडं वितळेल.
संतुलन ठेवा, खूप वाईन ओतू नका आणि ग्लासही भरू नका.
यापूर्वी गेल्या वर्षी 'गॅटरवाईन' (Gatorwine) देखील असेच व्हायरल झाले होते. रेड वाईन आणि आईसक्रीमचं हे अनोखं जुगाड दाखवून देतं की, थोडीशी क्रिएटिव्हिटी आणि प्रयोगशीलता अगदी अनपेक्षित गोष्टींनाही स्वादिष्ट बनवू शकते!