Red Sprites Video X Photo
राष्ट्रीय

VIDEO: हिमालयाच्या आकाशात चमकली ‘उलटी वीज’; नेमकं काय आहे रेड स्प्राइट्सचं रहस्य?

खगोल छायाचित्रकार डोंग शूचांग यांनी ५ हजार मीटरहून अधिक उंचीवरून जमिनीकडून आकाशात जाणारी वीज म्हणजेच रेड स्प्राइट्स या दुर्मिळ वातावरणातील विद्युत घटनांचे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Red Sprites Video

नवी दिल्ली: चीनी खगोल छायाचित्रकार डोंग शूचांग यांनी ५ हजार मीटरहून अधिक उंचीवरून जमिनीकडून आकाशात जाणारी वीज म्हणजेच रेड स्प्राइट्स आणि घोस्ट स्प्राइट्स या दुर्मिळ वातावरणातील विद्युत घटनांचे दृश्य आपल्या हाय-स्पीड कॅमेऱ्यात कैद केले आहे. तिबेटमधील पुमा युमको सरोवराजवळ २६ मे रोजी घडलेल्या आकाशातील या दुर्मिळ खगोलीय घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिबेटमधील शानन शहराजवळ असलेल्या पुमा युमको सरोवराच्या परिसरात रात्रीचे आकाश अचानक लाल-नारंगी प्रकाशाने उजळून निघाले. प्रसिद्ध खगोल छायाचित्रकार डोंग शूचांग यांनी आपल्या सोनी अल्फा १ हाय-स्पीड कॅमेऱ्याद्वारे या दुर्मिळ घटनेचा अत्यंत स्पष्ट व्हिडिओ केला. विशेष म्हणजे त्यांनी सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरील वातावरणातील विद्युत घटना टिपल्या. या व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या रेड स्प्राइट्ससह हिरव्या प्रकाशाचे ‘घोस्ट स्प्राइट्स’ही दिसून आले. ऑक्सिजन अणूंच्या विशिष्ट प्रतिक्रियेमुळे तयार होणारे हे हिरवे प्रकाशझोत वैज्ञानिकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात.

रेड स्प्राइट्स म्हणजे काय?

रेड स्प्राइट्स ही पृथ्वीच्या वातावरणात घडणारी अत्यंत दुर्मिळ विद्युत घटना आहे. सामान्य विजेप्रमाणे ती ढगांमधून जमिनीकडे येत नाही, तर उलट वरच्या दिशेने पसरते. वैज्ञानिक भाषेत यांना ट्रान्झिएंट ल्युमिनस इव्हेंट्स, असे म्हटले जाते.

हे स्प्राइट्स साधारणपणे मेसोस्फिअरमध्ये, म्हणजेच पृथ्वीपासून ५० ते ९० किलोमीटर उंचीवर दिसतात. त्यांचा आकार जेलीफिश, गाजर किंवा उंच खांबांसारखा भासू शकतो. काही स्प्राइट्सची लांबी अनेक किलोमीटरपर्यंत असते, मात्र ते केवळ काही मिलिसेकंदांसाठीच दिसतात. त्यामुळे त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहणे जवळपास अशक्य असते. स्प्राइट्सचा लाल रंग वरच्या वातावरणातील कमी दाबाच्या भागात नायट्रोजन अणूंमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत उत्तेजनामुळे तयार होतो.

रेड स्प्राइट्स कसे तयार होतात?

रेड स्प्राइट्स तयार होण्यासाठी जमिनीच्या जवळ अत्यंत शक्तिशाली वादळ असणे आवश्यक असते. विशेषतः ढगांमधून जमिनीकडे धन-विद्युतभारित असलेली वीज कोसळल्यास ढगांच्या वरच्या भागात प्रचंड विद्युत क्षेत्र तयार होते. हे विद्युत क्षेत्र इतके शक्तिशाली असते की त्याचा परिणाम सुमारे ८० किलोमीटर उंचीवरील मेसोस्फिअरपर्यंत पोहोचतो. तेथे हवेचा दाब अत्यंत कमी असल्याने कमी व्होल्टेजमध्येही मोठ्या प्रमाणावर विद्युत विसर्जन घडते आणि रेड स्प्राइट्स निर्माण होतात.

या घटना बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी आणि वादळ असताना दिसून येतात. स्वच्छ आकाश आणि उंच प्रदेशांमधून त्यांचे निरीक्षण करणे अधिक सोयीचे ठरते. हिमालयासारख्या भागांमध्ये विरळ हवा आणि कमी प्रदूषणामुळे स्प्राइट्स अधिक स्पष्ट दिसतात.

तिबेटमधील घटनेचे वैशिष्ट्य काय?

२६ मे २०२६ रोजी डोंग शूचांग हे पुमा युमको सरोवराजवळ ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर उपस्थित होते. हवामानाचा अंदाज आणि उपग्रहांच्या माहितीच्या आधारे त्यांनी या निरीक्षणाची पूर्वतयारी केली होती. त्यांच्या हाय-स्पीड कॅमेऱ्याने स्प्राइट्सचे स्लो-मोशन दृश्य टिपले. विरळ वातावरणामुळे त्यांना ४०० किलोमीटर अंतरावरील विद्युत घटना स्पष्टपणे पाहता आल्या. विशेष म्हणजे या रेकॉर्डिंगमध्ये हिरव्या रंगाचे ‘घोस्ट स्प्राइट्स’ही दिसले, जे ऑक्सिजन अणूंच्या उद्दीपनामुळे निर्माण होतात. शूचांग यांच्या मते, गेल्या चार वर्षांत त्यांनी केलेल्या निरीक्षणांपैकी हे सर्वात स्पष्ट आणि भव्य स्प्राइट्स रेकॉर्डिंग आहे. व्हिडिओमध्ये हे प्रकाशझोत आकाशातील फटाके किंवा विशाल जेलीफिशप्रमाणे दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT