Sabastian Sawe | वेगाचे दुसरे नाव...

Sabastian Sawe  |
Sabastian Sawe | वेगाचे दुसरे नाव...
Published on
Updated on

नितीन कुलकर्णी

केनियाच्या सेबेस्टियन सावे याने लंडन मॅरेथॉनमध्ये इतिहास घडवत दोन तासांच्या आत शर्यत पूर्ण केली. त्याचे यश म्हणजे मानवी इच्छाशक्तीने मिळवलेला विजय आहे. सावेचा 1 तास 59 मिनिटे 30 सेकंदांचा प्रवास येणार्‍या कित्येक शतकांसाठी प्रेरणेचा एक अखंड महास्रोत म्हणून ओळखला जाईल. त्याचा पराक्रम हा आधुनिक क्रीडा संस्कृतीतील एक सुवर्ण अध्याय आहे.

जागतिक क्रीडाविश्वात काही कामगिरी अशा असतात की, त्या केवळ विक्रम राहत नाहीत, तर मानवी क्षमतेच्या मर्यादांवरच प्रश्नचिन्ह उभे करतात. अंतराळ विज्ञानात जेव्हा नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा मानवी कल्पनाशक्तीला जेवढे मोठे क्षितिज मिळाले, तितकाच अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पराक्रम केन्याच्या सेबेस्टियन सावे याने लंडनच्या रस्त्यांवर करून दाखवला आहे. मॅरेथॉनच्या जगात गेली अनेक दशके ‘दोन तासांची सीमा’ (सब-टू अवर बॅरिअर) हा एक अभेद्य किल्ला मानला जात होता. तो सर करणे मानवी फुफ्फुसे आणि स्नायूंना कधीच शक्य होणार नाही, असे अनेक क्रीडा वैज्ञानिकांचे ठाम मत होते; मात्र 28 एप्रिल 2026 रोजी सेबेस्टियन सावे याने 1 तास 59 मिनिटे 30 सेकंदांत 42.195 किलोमीटरचे अंतर पार करून ‘सुपर ह्युमन’ असण्याचा एक नवा आणि जिवंत पुरावा जगासमोर सादर केला.

मॅरेथॉन शर्यत दोन तासांच्या आत पूर्ण करणे म्हणजे नक्की काय, हे सर्वसामान्यांच्या भाषेत समजून घ्यायचे असेल, तर क्रिकेटच्या शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावांची गरज असताना फलंदाजाने कोणत्याही दबावाशिवाय सहा चेंडूंत सहा षटकार मारण्यासारखा हा प्रकार आहे. सावे याने हे अफाट अंतर कापण्यासाठी प्रत्येक किलोमीटर अवघ्या 2 मिनिटे 50 सेकंदांत पूर्ण केले. आपण जेव्हा जिमला जातो आणि ट्रेडमिलवर आपली पूर्ण ताकद लावून धावतो, तेव्हा तो वेग आपण कदाचित एक किंवा दोन मिनिटे टिकवू शकू; पण सावेने हाच वेग सलग 120 मिनिटे कोणत्याही विश्रांतीशिवाय कायम राखला. विशेष म्हणजे, शर्यतीचा पूर्वार्ध त्याने 60 मिनिटे 29 सेकंदांत पूर्ण केला होता; मात्र खर्‍या चिकाटीचे दर्शन उत्तरार्धात घडवले. शेवटच्या टप्प्यात जेव्हा शरीरातील ऊर्जेचा साठा पूर्णपणे संपत आलेला असतो, तेव्हा सावेने आपला ‘टॉप गिअर’ टाकला आणि उर्वरित अर्धी शर्यत 59 मिनिटे 1 सेकंदांत पार केली. यालाच धावण्याच्या भाषेत ‘निगेटिव्ह स्प्लिट’ असे म्हणतात, जे साध्य करणे जागतिक स्तरावरील धावपटूंनाही स्वप्नवत वाटते.

सावे याच्या या यशामागे केवळ कठोर सराव नसून, त्याच्या शरीरातील नैसर्गिक रचनाही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सावे हा केनियाच्या ‘नंदी’ या जमातीतून येतो, जी ‘कालेनजिन’ समुदायाचा एक अविभाज्य भाग आहे. जगातील आजवरचे जवळजवळ सर्व महान मॅरेथॉनपटू याच मातीतून आले आहेत. शरीरविज्ञानाच्या द़ृष्टीने पाहिले, तर केन्याई धावपटूंच्या पिंडर्‍या (काफ मसल्स) पाश्चात्त्य धावपटूंच्या तुलनेत अत्यंत पातळ आणि वजनाने हलक्या असतात. भौतिकशास्त्राचा साधा नियम सांगतो की, शरीराचा खालचा भाग जितका जड असेल, तितका तो पुढे फेकण्यासाठी ऊर्जा जास्त खर्च करावी लागते. सावेचे पाय एखाद्या लयबद्ध पेंडुलमप्रमाणे काम करतात, ज्यामुळे त्याची शारीरिक ऊर्जा कमी खर्च होते. यालाच वैज्ञानिक परिभाषेत ‘रनिंग इकॉनॉमी’ म्हणतात. कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापणारे सावे हे एक नैसर्गिक ‘टर्बो इंजिन’ ठरले आहे.

सेबेस्टियन सावे याचा सराव केनियातील ‘इटेन’ या भागात झाला आहे, ज्याला जागतिक स्तरावर ‘होम ऑफ चॅम्पियन्स’ म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून साधारण 8000 फूट उंचीवर असलेल्या या भागात हवेत ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असते. अशा ठिकाणी धावताना शरीराला आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. सावेने जेव्हा अशा वातावरणात वर्षानुवर्षे सराव केला, तेव्हा त्याच्या शरीराने या कमतरतेवर मात करण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिन आणि ‘लाल रक्तपेशीं’ची मात्रा नैसर्गिकरीत्या वाढवली. परिणामी, जेव्हा तो लंडन किंवा न्यूयॉर्कसारख्या समुद्रसपाटीवर असलेल्या शहरांमध्ये धावायला येतो, तेव्हा त्याच्या स्नायूंना मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा इतर कोणत्याही सामान्य अ‍ॅथलीटपेक्षा कित्येक पटीने जास्त असतो. ही नैसर्गिक क्षमता त्याला शर्यतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत थकवा जाणवू देत नाही.

आजच्या व्यावसायिक क्रीडा जगतात विक्रमांसोबतच अनेकदा संशयाचे धुकेही दाट असते. सावे याच्या या जागतिक विक्रमावर भविष्यात कोणीही तांत्रिक किंवा नैतिक बोट उचलू नये, यासाठी त्याने आणि त्याच्या पुरस्कृत कंपनीने शर्यतीपूर्वी दोन महिने तब्बल 25 वेळा प्रगत उत्तेजक चाचण्या (डोप टेस्ट) करून घेतल्या. या अभूतपूर्व पारदर्शकतेमुळेच त्याच्या यशाची झळाळी अधिक वाढली आहे. तांत्रिक बाजूचा विचार केल्यास सावेच्या पायात असलेल्या शूजमधील ‘कार्बन प्लेट’ने मोलाची भूमिका बजावली. या ‘मिड-सोल’मध्ये असलेली कार्बन प्लेट धावपटूला जमिनीकडून मिळणारी ऊर्जा पुन्हा परत देते, ज्यामुळे स्नायूंवर येणारा ताण कमी होतो. या तंत्रज्ञानावरून क्रीडाविश्वात वाद असले, तरी ते तंत्रज्ञान योग्यरीत्या पेलण्यासाठी लागणारी मूळ शारीरिक क्षमता केवळ सावेसारख्या असामान्य धावपटूकडेच असू शकते.

मॅरेथॉनचा इतिहास 490 ईसापूर्व काळातील ‘फिडिपीडेस’ या सैनिकाच्या बलिदानाशी जोडलेला आहे. युनान आणि फारस यांच्यातील युद्धात विजय झाल्याची वार्ता पोहोचवण्यासाठी तो मैलोन् मैल धावला होता आणि बातमी सांगितल्यावर त्याने आपले प्राण सोडले होते. पुढे 1896 मध्ये आधुनिक ऑलिम्पिकमध्ये या शौर्याच्या आठवणीत मॅरेथॉनचा समावेश झाला. मात्र, आज जे आपण 42.195 किलोमीटरचे अधिकृत अंतर पाहतो, त्याला एक रंजक ‘रॉयल टच’ लाभलेला आहे. 1908 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश राजघराण्याला ही शर्यत आपल्या ‘विंडसर कॅसल’च्या खिडकीतून सुरू होऊन स्टेडियममधील ‘रॉयल बॉक्स’ समोर संपलेली पाहायची होती. राजघराण्याच्या या इच्छेखातर शर्यतीचे अंतर थोडे वाढवण्यात आले, जे पुढे 1921 मध्ये जागतिक प्रमाण बनले. सावेने याच अंतरावर आता आपले नाव कोरले आहे.

सावेचे यश हे केवळ प्रयोगशाळेत किंवा वातानुकूलित खोलीत तयार झालेले नाही. केनियातील खडतर रस्ते, मक्याच्या पिठापासून बनवलेले ‘उगाली’ हे साधे जेवण आणि दर आठवड्याला किमान 200 किलोमीटर धावण्याचा अचाट सराव यातून तो तावून सुलाखून निघाला आहे. केनियामध्ये धावणे हा केवळ छंद नसून दारिद—्यातून बाहेर पडण्याचा तो एक प्रबळ मार्ग आहे. सावे आजही 50-60 धावपटूंच्या गटात सराव करतो, जिथे एकमेकांना प्रोत्साहन देण्याची एक अनोखी संस्कृती जपली जाते.

सेबेस्टियन सावे याने लंडनच्या फिनिश लाईनवर नोंदवलेली वेळ हा मानवी इच्छाशक्तीने विज्ञानावर मिळवलेला विजय आहे. मानवी शरीर हे केवळ हाडामांसाचा गोळा नसून, जर त्याला योग्य जिद्द आणि विज्ञानाची जोड मिळाली, तर ते कोणत्याही सीमा ओलांडू शकते, हे त्याने सिद्ध केला. सावेचा हा 1 तास 59 मिनिटे 30 सेकंदांचा प्रवास येणार्‍या कित्येक शतकांसाठी प्रेरणेचा एक अखंड महास्रोत म्हणून ओळखला जाईल. त्याने रचलेला हा विक्रम म्हणजे आधुनिक क्रीडा संस्कृतीतील एक सुवर्ण अध्याय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news