नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याने गेल्या वर्षभरात जागतिक बाजारातील सोन्याचे भाव तब्बल १८ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे निर्माण झालेले राजकीय धोके, पतधोरणाबाबत वाढलेल्या अपेक्षा, अशा विविध कारणांसाठी आरबीआयने गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. आयात शुल्कात कपात केल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली.
त्यात सण, उत्सव आणि लग्नसमारंभात सोने खरेदी परंपरा भारतात आहे. ती मागणीही कायमच असल्याने देशातून होणाऱ्या एकूण सोन्याच्या मागणीत वाढ झाली.
आरबीआयने जून महिन्यात तब्बल ९.३ टन सोने खरेदी केले. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वांत मोठी मासिक खरेदी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांतील आरबीआयने केलेली सोने खरेदी ४४.३ टनांवर गेली आहे, तर आरबीआयचा एकूण सोन्याचा साठा ८४९ टनांवर गेला आहे.
जुलै महिन्यात ३.१ अब्ज डॉलर सोन्यात गुंतविले आहेत. एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीत आरबीआयने दरमहा सरासरी ३.२ अब्ज डॉलरची सोन्यात गुंतवणूक केली आहे. जुलै २०२३च्या तुलनेत यंदा आरबीआयचे सोने खरेदी बिल ११ टक्क्यांनी कमी आहे.