Ram Temple donation theft File Photo
राष्ट्रीय

Ram Temple donation theft: राम मंदिर बांधकामासाठी ८०० कोटींचे बजेट, २,२०० कोटींचा खर्च; SIT कडे महत्त्वाचे पुरावे

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण आणि देणगी चोरीप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

मोहन कारंडे

Ram Temple donation theft:

अयोध्या: अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण आणि देणगी चोरीप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक खुलासा समोर आला आहे. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ट्रस्टचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर जाहीर आरोप करणारे माजी लेखा प्रमुख महिपाल सिंह यांनी, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे सादर केले आहेत; तसेच त्यांनी काही नवीन आरोपही केले आहेत.

ट्रस्टच्या स्थापनेवेळी मंदिर निर्मितीचा अंदाजित खर्च ८०० कोटी रुपये होता, परंतु काही मोजक्या लोकांना आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी हा खर्च २,२०० कोटी रुपयांपर्यंत फुगवण्यात आल्याचा गंभीर आरोप महिपाल सिंह यांनी केला आहे. २६ जुलै रोजी एसआयटीचे प्रमुख तथा लखनऊचे आयुक्त विजय विश्वास पंत यांनी महिपाल सिंह यांना ई-मेलद्वारे आरोपांसंबंधी पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सिंह यांनी कागदपत्रे सादर करत ट्रस्टचे तत्कालीन सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे नवीन आरोपही केले आहेत.

देणगी चोरीची प्रकरणे दाबल्याचा आरोप

महिपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्येच त्यांनी मंदिरातील देणगीच्या रकमेत होणारी चोरी पकडली होती. रामशंकर यादव यांच्या शहावरून बँकेचे कर्मचारी रत्नेश चतुर्वेदी आणि गगनदीप हे कॅश मोजताना नोटांचे अतिरिक्त बंडल चोरून न्यायचे. ही बाब चंपत राय यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी "शांत राहा" असा सल्ला दिला आणि दुसऱ्याच दिवशी डॉ. अनिल मिश्रा यांनी महिपाल सिंह यांची हकालपट्टी करून सुभाष श्रीवास्तव यांची नियुक्ती केली. विशेष म्हणजे, हाच सुभाष श्रीवास्तव सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.

अयोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि निकृष्ट साहित्य खरेदी

महिपाल सिंह यांनी एसआयटीला सादर केलेल्या पुराव्यांमध्ये इतरही अनेक गंभीर बाबींवर बोट ठेवले आहे. सिविल इंजिनिअरिंगचा कोणताही अनुभव नसताना इलेक्ट्रिकल इंजिनिअर जगदीश आफले यांना प्रोजेक्ट इंजिनिअर बनवले गेले, ज्यामुळे मंदिराचे बांधकाम वास्तूनुसार झाले नाही. मोफत उपलब्ध असणारे प्रसिद्ध 'बंशी पहाडपूर'चे दगड न वापरता ट्रस्टने निकृष्ट दर्जाचे दगड विकत घेतले. विनामूल्य जागा मिळत असतानाही एका महांताला खूश करण्यासाठी ट्रस्टचे कार्यालय महांत शशिकांत दास यांच्या राम कचेरी मंदिरात सुरू करण्यात आले. याशिवाय अनेक वादग्रस्त जमिनी खरेदी केल्या गेल्या, ज्यांचा ताबा ट्रस्टला मिळालाच नाही आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये कोट्यवधी रुपये वाया गेले. माजी कॅशियर वीरेंद्र वर्मा यांनी काम न केलेल्या व्यक्तींच्या नावे परस्पर पैसे लाटल्याचेही पुराव्यांत नमूद आहे.

संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या सीएकडेच बँक खात्यांची सूत्रे

देणगी चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यापासून ट्रस्टचे आर्थिक व्यवस्थापन पाहणारे चार्टर्ड अकाउंटंट चंदन राय यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कंत्राटदारांची बिले रोखून धरून त्यांना त्रास देणे आणि अधिक रकमेची बिले मंजूर करणे, असे आरोप चंदन राय यांच्यावर आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, त्याच चंदन राय यांना ट्रस्टने बँक खात्यांच्या व्यवहारांसाठी अधिकृत केले आहे. आता अंतरिम सरचिटणीस कृष्ण मोहन, इंजिनिअर जगदीश आफले आणि चंदन राय यांच्या स्वाक्षरीनेच बँकेत पैसे जमा केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT