Ram Temple ceo File Photo
राष्ट्रीय

Ram Mandir CEO appointment : राम मंदिर सीईओपदाच्‍या शर्यतीत पांडे, मिश्रा आघाडीवर, मंगळवारच्या बैठकीत निर्णय होण्‍याची शक्‍यता

पुढारी वृत्तसेवा

अयोध्‍या : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाच्‍या शर्यतीत प्रयागराजचे माजी आयपीएस अधिकारी राजेश पांडे आणि गोंडाचे माजी आयएएस अधिकारी योगेश्वर मिश्रा यांची नावे आघाडीवर असल्‍याचे सांगण्‍यात येते.

बुधवारी (दि. २) ट्रस्‍टची महत्त्वाची बैठक होत असून‍, त्‍यात राम मंदिर परिसराशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांसोबतच सीईओ नियुक्‍तीचा निर्णयही होऊ शकतो, असे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

मंदिराची व्यवस्था अधिक व्यावसायिक आणि पारदर्शक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्तीच्‍या हालचाली सुरू असून, काही उमेदवारांच्‍या मुलाखतीही झाल्‍या आहेत. आता त्‍यावर अंतिम निर्णय होण्‍याची शक्‍यता आहे.

ट्रस्‍टच्‍या बैठकीकडे लक्ष

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला राम मंदिर उभारणीची सध्याची स्थिती, मंदिर परिसरातील व्यवस्था व भविष्यातील योजनांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्‍त झाले आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी वाढणारी भाविकांची संख्या आणि मंदिर परिसरात सुविधांचा दर्जा उंचावण्‍याबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते.

शिवाय बैठकीत मंदिराशी संबंधित प्रशासकीय आणि व्यवस्थापनाच्या मुद्द्यांसोबतच निर्माणकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. याशिवाय भाविकांची सोय, सुरक्षा व्यवस्था आणि राम मंदिर परिसराच्या आगामी व्यवस्थेवर ट्रस्टचे सदस्य सविस्तर विचारविनिमय करू शकतात.

राजेश पांडे : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे रहिवासी असलेले राजेश पांडे हे उत्तर प्रदेश केडरच्या २००३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २१ फेब्रुवारी १९८९ रोजी उत्तर प्रदेश पोलिस दलात डीएसपी पदावर त्यांची नियुक्ती झाली होती आणि २००३ मध्ये ते पदोन्नतीने आयपीएस झाले. नंतर ३० जून २०२१ रोजी ते ‘आयजी इलेक्शन सेल’ पदावरून निवृत्त झाले. त्यांना ‘एनकाऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. ते उत्तर प्रदेशच्‍या एसटीएफ आणि एटीएसचे संस्थापक सदस्य राहिले आहेत.

योगेश्वर मिश्रा : योगेश्वर राम मिश्रा हे उत्तर प्रदेश केडरच्या २००५ च्या बॅचचे निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. ८ मे १९६४ रोजी जन्‍मलेल्‍या मिश्रा यांनी कार्यकाळात निम्‍नस्‍तर अधिकारी, जिल्हाधिकारी, विशेष सचिव आणि विभागीय आयुक्त यांसह विविध पदांवर काम केले. १८ मे २०२३ पासून निवृत्तीपर्यंत ते उत्तर प्रदेशच्‍या गोंडा येथे विभागीय आयुक्त होते. त्यांनी भू-महसूल विभागात जनगणना संचालन संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT