Rajya Sabha Election 2026 Pudhari
राष्ट्रीय

Rajya Sabha Election 2026: राजकारण तापणार! 10 राज्यांतील राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

Rajya Sabha Election 2026: राज्यसभेच्या 24 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून 10 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.

Rahul Shelke

Rajya Sabha Election 2026: भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. जून-जुलै महिन्यात 10 राज्यांतील राज्यसभेच्या 24 सदस्यांचा कार्यकाळ संपणार असून, त्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील दोन राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणाही करण्यात आली आहे.

कधी होणार मतदान?

राज्यसभेच्या या जागांसाठी मतदान 18 जून रोजी होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी करून निकालही जाहीर करण्यात येणार आहेत. सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

राज्यसभा निवडणुकीसाठी 1 जून रोजी अधिसूचना (Notification) जारी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 8 जूनपर्यंत अर्ज (नामांकन) दाखल करता येणार आहेत. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण होईल आणि 18 जूनला मतदान व निकाल जाहीर केला जाईल.

या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे, कारण गुजरातपासून राजस्थानपर्यंत अनेक राज्यांमध्ये राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीमुळेही राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या राज्यात किती जागांसाठी निवडणूक होणार?

राज्यसभा निवडणुका 10 राज्यांमध्ये होणार आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी 4 जागांसाठी, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3 जागांसाठी मतदान होईल. याशिवाय झारखंडमध्ये 2 जागांसाठी, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून ठेवण्यात आली आहे.

दोन जागांसाठी पोटनिवडणूकही होणार

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणाही केली आहे. या दोन्ही जागा संबंधित नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी आमदार झाल्यानंतर 6 मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

तर तामिळनाडूमध्ये सी. व्ही. षण्मुगम यांनी विधानसभा निवडणुकीत मैलम मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर 7 मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 29 जून 2028 पर्यंत होता.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, 18 जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील.

निष्पक्ष निवडणुकीसाठी आयोगाचे विशेष निर्देश

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी यासाठी आयोगाने विशेष पर्यवेक्षक (Observers) नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT