Rajya Sabha 2026: 2026 मध्ये राज्यसभेच्या तब्बल 72 जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम केंद्रातील राजकारणावर, सत्ताधारी एनडीएची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर होणार आहे. सध्या राज्यांच्या विधानसभांची स्थिती पाहता, भाजप आणि एनडीएची राज्यसभेतील संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात.
राज्यसभेतील बहुमताचे गणित बदलणार असले, तरी एनडीए आपली पकड अधिक मजबूत करणार आहे. यामुळे केंद्र सरकारला संसदेत विधेयके मंजूर करून घेणे आणखी सोपे होणार आहे. दुसरीकडे, सरकारविरोधात दबाव निर्माण करण्याची विरोधकांची ताकद काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यसभेत भाजपचे 103 खासदार आहेत, तर संपूर्ण एनडीएचे 126 खासदार आहेत. 2026 मध्ये भाजपच्या 30 खासदारांचा कार्यकाळ संपणार असला, तरी किमान 32 नवीन खासदार भाजपचे निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय, जागावाटप आणि राजकीय समीकरणांमुळे भाजप आणखी 2-3 जागा जिंकू शकतो.
एनडीएतील मित्र पक्षांचेही प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. तेलुगु देशम पार्टी, जनसेना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा अधिक मिळू शकते. काही जागा कमी झाल्या तरी एकूणात एनडीए चांगल्या स्थितीत राहणार आहे.
अनेक ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, शरद पवार, दिग्विजय सिंह, अभिषेक मनू सिंघवी यांसारखे मोठे नेते आहेत.
याशिवाय, केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, उपेंद्र कुशवाहा, रामगोपाल यादव, हरिवंश नारायण सिंह (राज्यसभेचे उपसभापती) यांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. जर हे नेते पुन्हा निवडून आले नाहीत, तर त्यांचा केंद्रातील प्रभाव कमी होऊ शकतो.
2026 मध्ये सर्वाधिक म्हणजे 10 जागा उत्तर प्रदेशातून कमी होणार आहेत. या जागांपैकी बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या गणितानुसार, भाजप 7 ते 8 जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षाला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाचे राज्यसभेतील अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडू अशा अनेक राज्यांमध्येही जागा रिक्त होणार आहेत. बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांत भाजप चांगल्या स्थितीत, तर काही राज्यांत काँग्रेसला मर्यादित यश मिळू शकते.
महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार असून येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे राजकारण रंगणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुतेक जागा मिळतील, मात्र भाजप एक जागा जिंकू शकतो.
एकूण चित्र पाहता, 2026 मधील राज्यसभा निवडणुका सत्ताधारी एनडीएला अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारला संसदेतील कामकाज अधिक चांगले करता येईल, तर विरोधकांसाठी ही लढाई अधिक कठीण असणार आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकांवर अवलंबून असणार आहे.