Rajnath Singh
नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी एक मोठे विधान केले आहे. आज सिंध प्रदेश भारताचा भाग नसला तरी, भौगोलिक सीमा बदलू शकतात आणि भविष्यकाळात सिंध पुन्हा भारतात परत येऊ शकतो, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली येथे आयोजित 'सिंधी समाज संमेलन' कार्यक्रमात ते बोलत होते. मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावाचे असताना, राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजण्याची शक्यता आहे.
'सभ्यतागत दृष्ट्या सिंध कायमच भारताचा'
राजनाथ सिंह म्हणाले, "आज सिंधची भूमी भारताचा भाग नसेल, पण सभ्यतागत दृष्ट्या, सिंध नेहमीच भारताचा भाग असेल. आणि जमिनीचा विचार केल्यास, सीमा बदलू शकतात. कुणास ठाऊक, उद्या सिंध पुन्हा भारतात परत येईल." सिंध हा १९४७ पूर्वी अविभाजित भारताचा एक भाग होता. सध्याच्या पाकिस्तानमधील हा प्रांत सिंधी समुदायाचे मूळ ठिकाण आहे आणि सिंधू संस्कृतीचे उत्पत्ती स्थानही आहे. या समुदायाचा मोठा भाग आज भारतात वास्तव्यास आहे.
लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख
सिंह यांनी यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा खास उल्लेख केला. फाळणीनंतर अनेक दशके उलटूनही सिंधी हिंदू आणि सिंध प्रदेशाचे भावनिक नाते आजही कायम आहे, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, "अडवाणी यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिले आहे की सिंधी हिंदू, विशेषत: त्यांच्या पिढीतील लोक, आजही सिंध भारतापासून वेगळा झाल्याचे स्वीकारू शकलेले नाहीत."
सिंधू नदीचे पावित्र्य
राजनाथ सिंह यांनी सिंधू नदीच्या पावित्र्याचा मुद्दाही अधोरेखित केला. ते म्हणाले की, सिंधमध्ये हिंदू आणि अनेक मुस्लिम दोघांनीही सिंधू नदीच्या पाण्याला ऐतिहासिकदृष्ट्या पवित्र मानले आहे. "सिंधमधील अनेक मुस्लिमांनाही असे वाटायचे की सिंधूचे पाणी मक्केच्या 'आब-ए-जमजम' पेक्षा पवित्र आहे," असे त्यांनी अडवाणींच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट केले.