नवी दिल्ली : पाकिस्तान त्यांच्या भूमीवर दहशतवादाविरुद्ध कारवाई करू शकत नसेल तर भारत मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी (दि.२९) राज्यसभेत केले. भारतीय सैन्य सीमेच्या पलीकडेही दहशतवादाविरुद्ध लढण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले. लोकसभेत सोमवारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मंगळवारी राज्यसभेत देखील त्यांनी विशेष चर्चेला सुरुवात केली.
पुढे बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने खात्मा केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरातील 'ऑपरेशन सिंदूर' स्थगिती करण्यात आले आहे. जर पाकिस्तानने पुन्हा भारतात दहशतवादी कारवाया केल्या तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू केले जाऊ शकते.
भारताला पाकिस्तानसह संपूर्ण जगात दहशतवाद संपवायचा आहे. जर पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कारवाई करू शकत नसेल तर भारताची मदत घ्या, आम्ही मदत करण्यास तयार आहोत. आमचे सैन्य सीमेच्या या बाजूला तसेच दुसऱ्या बाजूला दहशतवादाविरुद्ध लढण्यास सक्षम आहे, हे ऑपरेशन सिंदूरने सिद्ध केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.