Rajkot Doctor Slaps Female Doctor Video: गुजरातमधील राजकोट येथील पीडीयू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादात एका वरिष्ठ डॉक्टरने महिला डॉक्टरच्या कानाखाली मारल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला. घटनेनंतर डॉक्टरांनी काम बंद करून आंदोलन केले. अखेर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
ही घटना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात घडल्याची माहिती आहे. महिला निवासी डॉक्टर डॉ. कृषाबेन निलेशभाई शिंगाला यांनी उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाच्या ऑक्सिजनसंदर्भातील अडचणीची वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन विठ्ठलभाई रमानी यांना माहिती दिली. रुग्णाच्या उपचारावर चर्चा सुरू असताना वाद वाढल्याचे सांगितले जात आहे.
आरोपानुसार, चर्चेदरम्यान डॉ. रमानी अचानक संतापले आणि महिला डॉक्टरला चापट मारली. त्यावेळी त्यांनी, ‘मला शिकवतेस का?’ अशा शब्दांत संताप व्यक्त केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी महिला डॉक्टरला धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महिला डॉक्टरला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले. त्यांनी काम बंद करून आपत्कालीन विभागाबाहेर आंदोलन केले. आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
निवासी डॉक्टरांनी आरोपी डॉ. रमानी यांच्याविरोधात आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टर अनेकदा मद्यधुंद अवस्थेत ड्युटीवर येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ते ज्युनिअर डॉक्टरांशी गैरवर्तन करत असून यापूर्वीही काही डॉक्टरांशी मारहाणीचे प्रकार घडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या आरोपांची चौकशी होणे बाकी आहे.
आंदोलक डॉक्टरांनी असा दावाही केला की, यापूर्वी रुग्णालय प्रशासनाकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाई झाली नाही. या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरात सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानेही तातडीने पावले उचलली आहेत. हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोनाली मकाडिया यांना त्यांच्या अतिरिक्त पदभारातून मुक्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणात पुढील चौकशी करून प्रशासकीय स्तरावर आणखी कारवाई केली जाऊ शकते. घटनेनंतर रुग्णालयातील कामकाज आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी डॉ. अश्विन विठ्ठलभाई रमानी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. हर्षद दुसारा यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल गांधीनगर येथील मुख्यालयाकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत आरोपी डॉक्टरला ड्युटीवर हजर राहू नये, अशा लेखी सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.