

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ‘नॅशनल मेडिकल रजिस्टर’बाबत पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोणत्याही राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आणि परवाना मिळवण्यासाठी एनएमआर नोंदणी पुन्हा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आयोगाने ठेवला आहे.
दोन वर्षांपूर्वी एनएमसीने आधुनिक वैद्यक व्यावसायिकांचा केंद्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी एनएमआर अनिवार्य केले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही यंत्रणा कार्यान्वित होण्यात अपयश आले होते. आता 'नोंदणी आणि वैद्यकीय व्यवसाय परवाना (सुधारणा) नियम, २०२६' च्या मसुद्यानुसार ही अट पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहे.
तीन महिन्यांची मुदत : ज्या डॉक्टरांकडे नोंदणी नाही, त्यांनी तीन महिन्यांत ईएमआरबी वेब पोर्टलवर माहिती अद्ययावत करून नोंदणी क्रमांक व व्यवसायाचा परवाना घेणे बंधनकारक राहील.
देशभरात एकच ओळख क्रमांक लागू
नवीन प्रस्तावानुसार एथिक्स अँड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्डद्वारे हे राष्ट्रीय रजिस्टर सांभाळले जाईल. राज्य वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत प्रत्येक डॉक्टरला एक युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक दिला जाईल. हा एनएमआर क्रमांक भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी वैध ठरेल.