राष्ट्रीय

Rajiv Gandhi death anniversary | माजी पंतप्रधान राजीव गांधींना स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आदरांजली अर्पण केली.

देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधींना अभिवादन केले

गुरुवारी सकाळी या सर्व नेत्यांनी राजीव गांधी यांच्या ‘वीरभूमी’ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली. यासह देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधींना अभिवादन केले. राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त करत राजीव गांधींना आदरांजली अर्पण केली. 

वडीलांच्या आठवणीत राहुल गांधींची भावुक पोस्ट

राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमीत्त राहुल गांधींनी वडिलांच्या आठवणीत भावूक संदेश लिहिला. बाबा, आपण ज्या कुशल, समृद्ध आणि मजबूत भारताचे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याची जबाबदारी मी पूर्ण करेन. आपली शिकवण, आपले संस्कार आणि आपल्या आठवणी कायम माझ्यासोबत राहतील, असा संदेश राहुल गांधींनी सोशल मीडियावर लिहिला. 

राजीव गांधींनी दूरगामी धोरणांची पायाभरणी केली

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. खर्गे म्हणाले की, २१व्या शतकातील आधुनिक भारताची पायाभरणी करण्यात राजीव गांधी यांनी ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका बजावली. युवा भारताच्या शक्तीवर विश्वास ठेवत त्यांनी मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षांवर आणले, पंचायतांना अधिकार देऊन लोकशाही गावागावांत मजबूत केली, तसेच दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाच्या माध्यमातून भारताला नव्या युगाची दिशा दिली. राजीव गांधी यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्यकाळात अनेक दूरगामी धोरणांची पायाभरणी केली.

भारताला आत्मनिर्भर, आधुनिक बनवण्याचा मार्ग मोकळा केला

नवीन शैक्षणिक धोरण, नवीन आरोग्य धोरण, गृहनिर्माण धोरण आणि सिंचन धोरण यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांनी विकासाला नवी दिशा दिली. पेयजल, लसीकरण, साक्षरता, पूरनियंत्रण, खाद्यतेल, दुग्ध उत्पादन आणि दूरसंचार या क्षेत्रांमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी मिशन सुरू करून भारताला आत्मनिर्भर आणि आधुनिक बनवण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांची विचारधारा केवळ वर्तमानापुरती मर्यादित नव्हती, तर येणाऱ्या पिढ्यांचा भारत घडवण्याची होती, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT