women smartphone ban
जालोर : एकीकडे देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असताना, राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. १५ गावांमध्ये सुना आणि तरुण मुलींना स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली असून त्यांना केवळ कीपॅड फोन वापरण्याचा आदेश दिला आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
गाजीपूर गावात आयोजित चौधरी समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १४ पट्टी उपविभागाचे अध्यक्ष सुजनाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत १५ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या नव्या नियमानुसार, महिलांना केवळ साधे कीपॅड फोन वापरता येतील. विशेष म्हणजे, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी जातानाही स्मार्टफोन नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
पंचायतीने स्पष्ट केले आहे की, शाळेत जाणाऱ्या मुली अभ्यासासाठी घरात मोबाईल वापरू शकतात. मात्र, त्यांनाही लग्नकार्य, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी मोबाईल नेण्याची परवानगी नसेल. समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पंच सदस्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे पंच हिंमताराम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
पंचायतीच्या या निर्णयावर टीका होत असताना, पंचायतीने मात्र याचे समर्थन केले आहे. सुजनाराम चौधरी यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. "घरातील महिला स्मार्टफोन वापरत असताना मुलेही त्याकडे आकर्षित होतात. अनेकदा महिला आपली कामे करण्यासाठी मुलांच्या हातात फोन देतात, ज्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहे. मुलांचे आरोग्य आणि संस्कार जपण्यासाठीच हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे."