Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: माजी सरपंचाची कुटुंबासह हत्या; स्कॉर्पिओमध्ये मृतदेह जाळले; पहिली पत्नी आणि मुले संशयाच्या घेऱ्यात

अजमेर जिल्ह्यातील अराई परिसरात गुरुवारी पहाटे जळालेल्या स्कॉर्पिओ गाडीत तीन मृतदेह आणि जवळच्या शेतात आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मोहन कारंडे

Crime News

अजमेर: राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील अराई परिसरात गुरुवारी पहाटे जळालेल्या स्कॉर्पिओ गाडीत तीन मृतदेह आणि जवळच्या शेतात आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा अपघात किंवा वाहनाला लागलेली आग असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळावरील पुरावे आणि घरातून सापडलेल्या रक्ताच्या खुणांमुळे हे नियोजित सामूहिक हत्याकांड असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मृतांमध्ये बोराडा ग्रामपंचायतीचे माजी काँग्रेस सरपंच रामसिंह चौधरी (वय ५२), त्यांची पत्नी व माजी अजमेर जिल्हा परिषद सदस्या सुरज्ञान देवी (वय ४५), आई पूसा देवी (वय ७८) आणि भाची महिमा यांचा समावेश आहे. श्रीरामपुरा गावाजवळील रस्त्यावर पहाटे एका ट्रक चालकाला स्कॉर्पिओला आग लागलेली दिसली. त्याने तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर पाण्याच्या टँकरच्या मदतीने सकाळी साडेपाचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. गाडीमध्ये तीन मृतदेह सापडले, तर चौथा मृतदेह जवळच्या शेतात आढळला.

प्राथमिक माहितीनुसार, पूसा देवी यांना छातीत दुखत असल्याने कुटुंब रुग्णालयात जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र, तपासादरम्यान श्रीरामपुरा येथील चौधरी यांच्या घरातून धक्कादायक पुरावे समोर आले. अजमेरचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अगरवाला यांनी सांगितले की, घरात रक्ताचे डाग आणि अन्य संशयास्पद पुरावे आढळल्यानंतर हत्या झाल्याचा संशय असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी घरातील मुख्य खोली नुकतीच धुतल्याचे निदर्शनास आले असून, तेथे रक्ताचे डाग आणि रक्त लागलेल्या दोन विटाही सापडल्या आहेत.

विशेष म्हणजे, जळालेली स्कॉर्पिओ ही स्थानिक रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला आढळली. तसेच घराजवळ डिझेल सांडल्याचे दिसल्याने हत्या घरातच करून मृतदेह स्कॉर्पिओत टाकून वाहन पेटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान कुटुंबातील वाद आणि कौटुंबिक हिंसाचाराची माहितीही समोर आली आहे. रामसिंह चौधरी यांच्या दोन पत्नी होत्या. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन किशोरवयीन मुले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, चौधरी यांना दारूचे व्यसन होते आणि ते पहिल्या पत्नीला मारहाण करत असत. बुधवारी रात्री घरातून मोठ्याने ओरडण्याचे आवाज ऐकू आल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. चौधरी हे पहिल्या पत्नीच्या मुलीला मारहाण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पोलिसांनी चौधरी यांच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या दोन मुलांना चौकशीसाठी बोलावले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, प्राथमिक तपासात मृतांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT