Indore Couple Missing in Meghalaya
इंदूर येथून हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँग येथे गेलेल्या तरुण उद्योजक राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी वेसावोंग धबधब्याच्या दरीत सापडला. ते २३ मे पासून बेपत्ता होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनम होती. त्याची हत्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'दाओ' हत्याराने वार करून करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.
राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला.
ज्या हत्याराने राजा यांची हत्या करण्यात आली ते विशेष तपास पथकाने जप्त केले आहे. जप्त केलेले हत्यार 'दाओ' आहे. याचा वापर अवजार म्हणून शेतीच्या कामासाठी केला जातो. पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलिसांनी हत्यार जप्त झाल्याची पुष्टी केली आहे. दरम्यान, आरोपी अद्याप सापडलेले नाहीत.
दरम्यान, या नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी आर्मीची मदत घेण्याची मागणी केली आहे.
"ही हत्या आहे यात काही शंका नाही. आम्हाला 'दाओ' हत्यार सापडले आहे. हे नवीनच असून याचा वापर मारण्यासाठी केला आहे," अशी माहिती पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सीयम यांनी दिली. आरोपींचा शोध सुरू आहे. पीडितेचा मोबाईलदेखील सापडला असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, राजा यांचा मृत्यू दरीत पडण्यापूर्वी की नंतर झाला हे स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. "कोणतीही शक्यता नाकारू शकत नाही. ही हत्या दरोडा, सुडाच्या भावनेने अथवा आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद होता का?, याची चौकशी केली जात आहे.
राजा यांच्या मृतदेहाजवळ एका महिलेचा पांढरा शर्ट, मोबाईलची तुटलेली स्क्रीन आणि औषधांचे पाकिटे आढळून आले आहे. त्यांच्या हातात स्मार्टवॉच होते. पण त्याचे पाकीट, सोन्याची चेन, अंगठ्या आणि दाम्पत्याचे चार मोबाईल फोन गायब आहेत, असे एसपी सीयम म्हणाले.
राजा यांचे आईने सोनम सोबतचे त्यांचे शेवटचे बोलणे नेमके काय झाले होते? याबद्दल सांगितले आहे. त्यांनी २३ मे रोजी उपवासाचा दिवस असल्याने तिची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांनी नवविवाहित जोडप्याला हायकिंग करण्यापूर्वी काहीतरी खाऊन जाण्यास सांगितले होते.
या कॉलचे रेकॉर्डिंग त्यांच्या कुटुंबाने शेअर केले आहे. ज्यात सोनमचा आवाज श्वास घेताना दमल्यासारखा ऐकू येतो. ती तिच्या सासूला सांगते की ते धबधबा पाहण्यासाठी जंगलात ट्रेकिंग करत आहेत. फोन अचानक बंद होतो. सोनम म्हणते की ती नंतर फोन करते. त्यानंतर तिचा कॉल आलाच नाही.