

नाशिक : मोठ्या भावाच्या मृत्यूला मित्र कारणीभूत असल्याच्या संशयातून दाेघांनी मिळून हमालीकाम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा खून फुलेनगर परिसरातील गौंडवाडी परिसरात केल्याची घटना घडली.
पंचवटी पोलिसांनी तपास करीत दोन संशयित मारेकऱ्यांना पकडले. विशाल कैलास क्षीरसागर (२४) व धीरज मनोहर सकट (३०, दोघे रा. विजय चौक, फुलेनगर) अशी संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत, तर संजय तुळशीराम सासे (४०, रा. महाराणा प्रतापनगर, फुलेनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संजय सासे यांची पत्नी रूपाली सासे यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. 1) मध्यरात्रीनंतर परिसरात देवीचे गाणे सुरू असल्याने त्यांचे पती संजय हे गाणे ऐकण्यास घराबाहेर गेले होते. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी संजय सासे यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर वजनदार वस्तू मारून जिवे मारल्याचे रूपाली यांना कळाले. रूपाली यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलिस ठाण्यात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीचे प्रभारी मधुकर कड यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पंकज सोनवणे, प्रकाश नेमाणे, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार संतोष जाधव, महेश नांदुर्डीकर आदींच्या पथकाने तपास करीत संशयित विशाल क्षीरसागर व धीरज सकट यांना अवधूतवाडी येथील गणपती मंदिराच्या छतावरून पकडले. याप्रकरणी पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पोलिस तपासात संशयित मारेकरी विशाल क्षीरसागरचा भाऊ प्रमोद क्षीरसागर याचा मृत्यू २४ सप्टेंबर २०२४ रोजी घरात झाला होता. मात्र प्रमोदच्या मृत्यूला संजय सासे जबाबदार असल्याचा संशय विशालला होता. यातून रविवारी मध्यरात्री विशाल व संजय यांच्यात वाद झाला. संतापात विशाल व त्याचा जोडीदार धीरज यांनी संजयला मारहाण करीत डोक्यात दगड व दारूची बाटली मारून खून केला. त्यानंतर दोघेही परिसरातच लपून बसले होते.