crime news Pudhari
राष्ट्रीय

Crime News : थरारक! प्रेयसीला रोखण्यासाठी बोनेटवर चढलेल्या तरुणाला कारने चिरडले

प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्‍या, चालक फरार; तरुणीचीही होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

Car Murder Case : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका तरुणाची कारने चिरडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील आमानाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एम्स (AIIMS) रुग्णालयासमोर हा धक्‍कादायक प्रकार घडला.

प्रेयकराची थेट बोनेटवर उडी

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटीबंध येथील रहिवासी परमप्रीत सिंह (३४) आणि दुर्ग येथील रहिवासी भरत मंगनानी यांच्यात एम्स रुग्णालयासमोर एका कारणावरून वाद झाला. प्राथमिक तपासात या वादाचे मूळ कारण प्रेमप्रकरण असल्याचे समोर येत आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी भरत मंगनानी हा आपल्या कारमध्ये बसून निघून जाऊ लागला. परमप्रीत सिंहने भरतची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. भरतने कार पुढे ढकलल्याने परमप्रीतला धडक बसली, तरीही त्याने कार अडवण्यासाठी थेट कारच्या बोनेटवर (छतावर) उडी मारली. मात्र, भरतने कार न थांबवता अत्यंत वेगाने पुढे पळवली.

थेट अंगावर गाडी घालून तरुणाला चिरडले

काही अंतरावर परमप्रीत कारवरून खाली रस्त्यावर पडला. तरीही निर्दयी आरोपीने कार थांबवण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडले आणि घटनास्थळावरून पोबारा केला. गंभीर दुखापत झाल्यामुळे परमप्रीतचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी केला पाठलाग, आरोपी फरार

घटनेनंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी कार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. काही प्रत्यक्षदर्शींनी त्याच्या कारचा पाठलागही केला, मात्र आरोपी पसार झाला. घटनेची माहिती मिळताच आमानाका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे पोलिसांनी हा प्रथमदर्शनी हत्येचाच प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बीएनएस कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल,तरुणीचीही होणार चौकशी

आमानाका पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भरत मंगनानीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीस खंगाळत आहेत.घटना घडली त्‍यावेळी तिथे एक तरुणीही उपस्थित असल्‍याची माहिती समोर आली आहे. पोलीस संबंधित तरुणीची चौकशी करत असून, त्‍या दोघांमध्‍ये नेमका काय वाद झाला होता, याची सविस्तर माहिती गोळा करत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच घटनेचा सर्व उलगडा होईल, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT