नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यात यावी. तसेच ही कबर राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून काढण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी (दि.२७) शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. (Aurangzeb Tomb Controversy)
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण पेटले आहे. विविध पक्षाच्या नेत्यांनी ही कबर उखडून टाकण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याच संदर्भात राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत भेट घेतली आणि यासंबंधी एक निवेदन दिले. यामध्ये शेवाळे म्हणाले की, खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची वाढती मागणी लक्षात आणून देत आहे. औरंगजेब हा असा शासक होता ज्याच्या कारकिर्दीत धार्मिक असहिष्णुता आणि छळाच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना त्याने क्रूरपणे मारले, संभाजी महाराजांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ४० दिवस छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ करण्यात आला. तसेच विविध अहवालांमधून असे समोर आले आहे की औरंगजेबाच्या कबरीला भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून कधी अधिसूचित केले याची कोणतीही अचूक नोंद नाही. मात्र सध्या ही कबर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे स्थळ म्हणून नोंद केलेली आहे. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८ अंतर्गत की कबर संरक्षित आहे, असेही शेवाळे म्हणाले.
औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी असूनही राज्य सरकार कोणतीही कारवाई करण्यास असमर्थ आहे. कारण ही जागा भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकारक्षेत्रात येते. प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यातील तरतुदींनुसार अशा कोणत्याही स्मारकाची यादी रद्द करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे मी या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांच्या यादीतून औरंगजेबाच्या कबरीचे नाव रद्द करण्याचे निर्देश देण्याची विनंती करतो. ही लोकभावना असून त्या जागेबाबत योग्य ती कारवाई करण्यास अनुमती द्यावी, असेही शेवाळे या निवेदनात म्हणाले.