Rahul Gandhi on Narendra Modi pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi: देश चालवणं आता 'कॉम्प्रमाईज्ड' पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर; राहुल गांधींचा मोदींवर बोचरा वार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन वापरात कपात करण्याचे जे आवाहन केले, त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मोहन कारंडे

Rahul Gandhi on Narendra Modi

नवी दिल्ली: देशातील वाढती महागाई आणि परकीय चलन साठ्यावरील दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचे आणि इंधन वापरात काटकसर करण्याचे जे आवाहन केले, त्यावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "पंतप्रधानांचे हे आवाहन म्हणजे उपदेश नसून, त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळातील अपयशाचा पुरावा आहे. देश चालवणं आता 'कॉम्प्रमाईज्ड' पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर आहे," अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे लक्षण

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "काल पंतप्रधान मोदींनी जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि 'वर्क फ्रॉम होम' करा. हे केवळ उपदेश नाहीत, तर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे लक्षण आहे."

'कॉम्प्रमाईज्ड' पंतप्रधानांना देश चालवणे आवाक्याबाहेर

राहुल गांधी पुढे म्हणाले की, १२ वर्षांच्या सत्ताकाळानंतर देशाची अशी स्थिती झाली आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे आणि कुठे जावे, हे सरकार सांगत आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेवर ओझे टाकले जाते. देश चालवणे आता या कॉम्प्रमाईज्ड पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

रविवारी हैदराबाद येथील एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा दाखला देत देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत असल्याचे सांगितले होते. या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी नागरिकांना पुढील काही गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले: पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मेट्रोचा वापर वाढवा, कारपूलिंग करा किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. शक्य असेल तिथे 'वर्क फ्रॉम होम' आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अवलंब करा. वर्षभरासाठी सोने खरेदी आणि परदेशवारी पुढे ढकला. तसेच खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी करा.

राष्ट्रीय कर्तव्य की आर्थिक संकट?

मोदी यांनी या उपाययोजनांना 'राष्ट्रीय कर्तव्य' असे म्हटले आहे. कोविड काळातील बदलांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, "ज्याप्रमाणे आपण कोरोना काळात नवीन पद्धती आत्मसात केल्या होत्या, तशीच गरज आता पुन्हा निर्माण झाली आहे. परकीय चलन वाचवणे हे आजच्या काळाची गरज आहे." पश्चिम आशियातील संघर्षामुळे पेट्रोल आणि खतांच्या किमती वाढल्या असून पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT