Rahul Gandhi Detained Delhi Police : निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करत असताना, लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांना आज (दि. ७) पोलिसांनी जंतरमंतरजवळ ताब्यात घेतले. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या खासदारांनी आरोप केला की, पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखले. राहुल गांधी यांना ताब्यात घेतले जात असताना घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. त्पूर्वी, विरोधी पक्षाच्या खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधून खाली उतरून त्यांनी 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या जंतरमंतरच्या दिशेने काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व केले होते.
निवडणूक आयुक्तांशी भेटीची मागणी करत विरोधी पक्षाने धरणे आंदोलन केले. 'एएनआय' ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी स्वतःहून गाडीत बसण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलले; त्यांनी वाहनाच्या दरवाजाच्या चौकटीला पाय घट्ट रोवून विरोध केला. अखेर पोलिसांनी त्यांना वाहनात जबरदस्तीने बसवले.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या देखील रस्त्यावरच ठिय्या मांडला. त्या म्हणाल्या, "निवडणूक आयुक्तांना भेटण्याची विनंती करणाऱ्या खासदारांशी ते अशी वागणूक देतात. आमच्याशीही ते तसेच वागतात. ते खासदारांना मारहाण करत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांनी मला अनेक ठिकाणी ओरखडे पाडले आहेत. आम्हाला जमिनीवर पाडण्यात आले. आम्ही आता इथून हलणार नाही. त्यांनी आणखी कुमक बोलावली तरीही मी इथून हटणार नाही." असा निर्धारही प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला.
'इंडिया' (INDIA) आघाडीच्या खासदारांना जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी अडवले होते. अनेक नेते आणि खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना आंदोलनस्थळाकडे जाण्यापासून जिथे अडवण्यात आले होते, त्या जंतरमंतरजवळील ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी प्रियांका गांधी वाड्रा यांना हटवले. पोलिसांनी आता या खासदारांना ताब्यात घेतले आहे.
दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले जात असताना आरजेडी खासदार मनोज कुमार झा म्हणाले, "त्यांनी अत्यंत क्रूरपणे लाठीचार्ज केला. यासाठी ज्ञानेश कुमार, अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे सर्वजण जबाबदार आहेत. अशी दृश्ये आम्ही अनेक वर्षांत पाहिली नाहीत. ही क्रूरतेची परिसीमा आहे. तुमचा खरा चेहरा समोर आला आहे. तुम्ही सर्वजण भित्रे आहात."
'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदार रेणुका चौधरी म्हणाल्या, केंद्र सरकार गुंडगिरी करत आहेत. आम्ही घाबरणार नाही. आम्ही देशातील तरुणांसाठी लढा देत आहोत."
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या, "शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांशी दिल्ली पोलीस ज्या क्रूरतेने वागत आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आमचा दोष काय आहे? दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्ते आणि सामान्य जनतेवर अशा प्रकारे निर्दयीपणे मारहाण आणि लाठीचार्ज का केला जात आहे? खासदारांना जंतर-मंतरवर जाण्यापासून का रोखले जात आहे? इथे नक्की काय चालले आहे?"