Rahul Gandhi NEET Protest Pudhari
राष्ट्रीय

Rahul Gandhi Protest: NEET, NTA आणि SSC... परीक्षा घोटाळ्यांविरोधात राहुल गांधी रस्त्यावर उतरणार; कुठे करणार आंदोलन?

Rahul Gandhi NEET Protest: पेपरफुटी, परीक्षा घोटाळे आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi NEET Protest: नीट, एनटीए, एसएससी परीक्षा घोटळा, पेपरफुटी आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर काँग्रेस आता देशभरात मोठे आंदोलन उभारणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची सुरुवात 17 जून रोजी राजस्थानमधील कोटा येथून होणार आहे.

काँग्रेसचे महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर देशव्यापी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.

वेणुगोपाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील गोंधळ, भरतीतील अनियमितता आणि बेरोजगारीमुळे लाखो तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या अभियानाअंतर्गत मोठ्या विद्यार्थी परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोटा येथे 17 जूनला पहिली सभा होईल. त्यानंतर 10 जुलैला इलाहाबाद, 11 जुलैला पटना आणि 14 जुलैला दिल्ली येथे विद्यार्थी संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या मते, परीक्षा घोटाळ्यांमुळे आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. तसेच शिक्षण आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.

या आंदोलनाद्वारे काँग्रेस देशभरातील विद्यार्थी, युवक संघटना, शिक्षक आणि परीक्षा घोटाळ्यांचा फटका बसलेल्या तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सोशल मीडिया मोहीम, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसमध्ये संपर्क अभियान, थेट संवाद कार्यक्रम आणि विविध जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.

राहुल गांधी यापूर्वीही नीट परीक्षेच्या विकेंद्रीकरणाची मागणी करत आले आहेत. तसेच परीक्षा शुल्क रद्द करणे, पेपरफुटी रॅकेटविरोधात कठोर कारवाई करणे आणि या प्रकरणांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेसचे म्हणणे आहे की, तरुणांच्या आशा-आकांक्षांशी तडजोड होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी हे आंदोलन उभारले जात आहे. आगामी काळात संसदेतही विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रश्नांवर राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याने येत्या काही आठवड्यांत या आंदोलनाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT