Rahul Gandhi | १८ वर्षांच्या मुलाने जे शोधले ते सीबीआयला दिसले नाही!

राहुल गांधींचा हल्लाबोल; सार्थक सिद्धांतसोबतच्या भेटीचा व्हिडीओ रीलिज
Rahul Gandhi |
Rahul Gandhi | १८ वर्षांच्या मुलाने जे शोधले ते सीबीआयला दिसले नाही!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने ज्या त्रुटी शोधून काढल्या त्या सीबीआयला शोधता आल्या नाहीत, हा तरुणांचा विजय आणि सरकारचा पराभव आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीतील त्रुटींवरून केंद्र सरकार आणि सीबीएसईवर जोरदार टीका केली. रांची येथील १८ वर्षीय विद्यार्थी सार्थक सिद्धांत याची भेट २ जून रोजी राहुल गांधींनी घेतली होती. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशातील १८ वर्षांच्या मुलाने सीबीआयपेक्षाही अधिक वेगाने आणि अचूकपणे काम करून दाखवले. ही तरुणाईने जिंकलेली लढाई असून सरकारचा पराभव आहे. राहुल गांधी यांनी त्याच्या विचारसरणी, धैर्य आणि तत्त्वनिष्ठेचे कौतुक केले. वयाने तो १८ वर्षांचा असला, तरी त्याची विचारशक्ती आणि तत्त्वांशी असलेली बांधिलकी कोणापेक्षा कमी नाही.' सार्थक आणि निसर्ग यांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, “हीच भारताची खरी युवा शक्ती आहे. जिज्ञासू, जागरूक आणि माहितीपूर्ण. देशाची भविष्यात दिशाभूल होणार नाही, याची खात्री अशाच तरुणांमुळे वाटते.”

राहुल गांधी यांनी विचारले, “जर १८ वर्षांचा विद्यार्थी ही त्रुटी शोधू शकतो, तर इतकी मोठी यंत्रणा ती का शोधू शकत नाही?” यावर सार्थक म्हणाला, “संबंधित अधिकारी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाहीत. निविदेचे नियम तीन वेळा बदलण्यात आले. त्यानंतर कोएम्प्ट एडुटेकला करार देण्यात आला. त्रुटी समोर आल्यानंतरही कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा कंपनीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना निर्माण होते.”

पंतप्रधानांना आंब्यांवर बोलायला वेळ

राहुल गांधी यांनी आणखी एका पोस्टमध्ये पंतप्रधानांवर टीका करत म्हटले की, “पंतप्रधानांकडे आंब्यांबद्दल बोलण्यासाठी वेळ आहे; पण १८.५ लाख विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी वेळ नाही. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग मोबाईल फोनद्वारे केले गेले. मे २०२५ मधील सीबीएसई निविदेमध्ये ३०० डीपीआय गुणवत्तेच्या स्वयंचलित रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंग करण्याची अट होती; मात्र ऑगस्टमधील नव्या निविदेमध्ये ही अट हटवून स्कॅनिंगची गुणवत्ता ३०० डीपीआयवरून २०० डीपीआयपर्यंत कमी केली.

संसदीय समितीसमोर ५०० पानी सादरीकरण

सार्थकने सीबीएसईमधील सुधारणा सुचवण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीसमोर सुमारे ५०० पानी सादरीकरणही केल्याचे सांगितले जाते. सीबीएसईच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्याची मागणी त्याने केली आहे.

मोदींना तरुणांनी फक्त रील्स बनवाव्यात असे वाटते...

देशातील तरुणांनी प्रश्न विचारू नयेत, फक्त रील्स बनवाव्यात आणि भजी तळावीत, अशी पंतप्रधानांची अपेक्षा आह; मात्र या तरुणांनी प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरेही शोधून काढली.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news