Rahul Gandhi Lok Sabha speech : "देशाच्या रस्त्यांवर उतरून आपल्या भावी पिढीने जे काही केले, ते पाहून मला खूप आनंद आणि दिलासा मिळाला. तो संताप नव्हता, हिंसा नव्हती किंवा द्वेषही नव्हता. या देशातील तरुणांच्या आणि भावी पिढीच्या भावनांची ती एक उत्कट अभिव्यक्ती होती. मला वाटते की भाजपमधील माझ्या मित्रांसह सर्वच राजकीय पक्षांनी या अभिव्यक्तीचा आदर केला पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे की भाजपमधील माझ्या सहकाऱ्यांनी घरी जाऊन त्यांच्या स्वतःच्या मुलांना विचारले, की तुमचे भाऊ-बहीण जे करत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तर त्यांची मुलेही या आंदोलनाशी सहमत असल्याचे त्यांना आढळेल. जे घडले त्यात काहीही चुकीचे नाही आणि प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे," अशा शब्दांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि.२९) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते लोकसभा परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा करताना बोलत होते. यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
यावेळी १८ वर्षांच्या एका विद्यार्थिनीने 'छात्रों की गूँज' कार्यक्रमात बोलताना माझा "विद्यार्थी या व्याख्येचा माझा दृष्टिकोणच बदला, असे सांगत राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीसोबत झालेल्या संवाद शेअर केला. राहुल गांधी म्हणाले, "ती विद्यार्थिनी म्हणाली की, एक प्रकारचा विद्यार्थी सत्याचा अभिमानाने स्वीकार करतो. मी विचारले, मग दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे काय? ती म्हणाली, दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्याला एका 'प्रतिमे'ची गरज असते. त्याला प्रतिमेची गरज असते आणि ती प्रतिमा खरी नसते. कारण तो मूर्ख आपण 'देव' आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याला ती प्रचंड मोठी प्रतिमा निर्माण करावी लागते. मी तिला एक प्रश्न विचारला, मग तिसरा प्रकार कुठे जातो? तो म्हणजे 'अंधभक्त'. ती म्हणाली, 'अंधभक्त' म्हणजे अशी व्यक्ती जिची पूर्णपणे खात्री असते की, समोरचा दुसरा मूर्ख माणूस हाच 'देव' आहे."
यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी मध्यस्ती करत आक्षेप घेतला. ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला नसता, तर कोणीही आक्षेप घेतला नसता. मला वाटते की ते एका विद्यार्थिनीच्या नावाखाली स्वतःचेच शब्द वापरत आहेत. त्यांना अशा असंसदीय शब्दांचा वापर करता येणार नाही आणि हे शब्द कामकाजातून काढून टाकले पाहिजेत."
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, दिल्लीतील नीट विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमाराचा आदेश केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच दिला. याला सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत आरोप मागे घेण्याचे आवाहन केले. यावरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.
राहुल गांधी यांनी आपल्या विधानांचे पुरावे द्यावे, अशी मागणी रिजिजू यांनी केली. तसेच राहुल गांधी यांनी हत्या केली, असे आम्ही सभागृहात बोलू शकतो का, असा सवाल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.