Rahul Gandhi  
राष्ट्रीय

Rahul Gandhi : ‘फिटनेसच्या निमित्ताने मुलींच्या गर्भधारणा चाचणीचा नियम अमानवी’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधी यांचे पत्र

वसतिगृहांच्या दुरवस्थेसह ३० वर्षांच्या अटीवर आक्षेप- आंदोलक विद्यार्थ्यांना भेटून प्रश्न तातडीने सोडवा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची तातडीने भेट घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील आदिवासी विद्यार्थी दहा दिवसांहून अधिक काळ उपोषण करीत असून, पुण्यात भेटलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहांमधील समस्या आणि शिक्षणातील अडथळ्यांची माहिती दिल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच फिटनेसच्या निमित्ताने मुलींच्या गर्भधारणा चाचणीचा नियम अमानवी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

दुर्गम गावांमधून शहरात शिक्षणासाठी येणारे अनेक आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहांवर अवलंबून असतात. मात्र, ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न देण्याच्या नव्या नियमामुळे शिक्षण पूर्ण करणारे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी अडचणीत आल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी उपस्थित केला. वसतिगृहांमध्ये अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. असुरक्षित परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना दुखापतींचा सामना करावा लागला असून, सर्पदंशामुळे मृत्यूच्या घटनाही घडल्याचे राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केले. महिला विद्यार्थिनींसाठी परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘गर्भधारणा चाचणीचा नियम अमानवी’

दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर वसतिगृहात परतणाऱ्या महिला विद्यार्थिनींची गर्भधारणा चाचणी आणि अन्य वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत असल्याच्या तक्रारीवर राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘फिटनेस’ सिद्ध करण्याच्या नावाखाली अशा चाचण्या घेणे हा विद्यार्थिनींच्या प्रतिष्ठेचा अपमान असून, त्यांच्याकडे दोषी असल्याप्रमाणे पाहण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘विद्यार्थी दयेची नव्हे, हक्काची मागणी करीत आहेत’

आदिवासी विद्यार्थी सरकारकडे कोणतीही दया किंवा उपकार मागत नसून, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा अधिकार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांना आरोग्य धोक्यात घालून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असेही त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी स्वतः भेटून त्यांचे प्रश्न ऐकावेत आणि त्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्रातून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT