Bihar Election 2025 :
पाटणा : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात स्थानिकांसोबत मासेमारीचा आनंद घेतला. निवडणूक प्रचार मोहिमेच्या मधल्या विश्रांतीत त्यांनी तलावात उडी घेत पोहण्याचाही आनंद लुटला. या प्रसंगी कॉंग्रेस नेते कन्हैया कुमारदेखील उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्थानिक मच्छीमारही तलावाच्या काठावर जमले होते, त्यापैकी काहींनी नेत्यांसोबत पाण्यात उडी घेतली.या घटनेचा व्हिडिओ कॉंग्रेसने X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला. पोस्टमध्ये नमूद करण्यात आले की, राहुल गांधींनी मच्छीमारांशी त्यांच्या कामातील अडचणी आणि संघर्षांवर चर्चा केली.
बेगूसरायमध्ये राहुल गांधींसोबत बिहारचे माजी मंत्री आणि विकासशील इंन्सान पार्टी (VIP)चे प्रमुख मुकेश सहनीही होते. सहनींची पार्टी INDIA आघाडीची घटक आहे. दोघांनीही तलावाच्या मध्यभागी जाण्यासाठी होडीचा वापर केला.मुकेश सहनी यांनी पाण्यात उतरून जाळं टाकलं. यानंतर राहुल गांधीही कमरेपर्यंत पाण्यात उतरून पकडलेल्या मास्यांची पाहणी करताना दिसले.
कॉंग्रेसच्या पोस्टमध्ये INDIA आघाडीच्या काही निवडणूक आश्वासनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं अहो की, बिहारमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक मच्छीमार कुटुंबाला ५,००० ची आर्थिक मदत दिली जाईल. राहुल गांधी म्हणाले की, “मच्छीमार हे बिहारच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्या संघर्षात मी त्यांच्या पाठीशी उभा आहे.”