Rahul Gandhi against FIR in Darbhanga
पटणा : बिहार येथे दौऱ्यानिमित्त गेलेल्या राहूल गांधी यांच्यावर दरभंगा जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरभंगाच्या लाहेरियासराय पोलिस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. राहुल गांधींसह २० नेते आणि सुमारे १०० अज्ञात लोकांना आरोपी करण्यात आले आहे. येथे आंबेडकर हॉस्टेलमध्ये परवानगी नसताना कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला आहे.
राहूल गांधी यांनी दरभंगा येथील अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) समुदायाच्या विद्यार्थ्यांना भेटले होते. ही बैठक आंबेडकर वसतिगृहात झाली, ज्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. वसतिगृहात कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला परवानगी नव्हती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत.
या एफआरआयमध्ये कलम १६३ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित असलेले दरभंगा येथील दंडाधिकारी खुर्शीद आलम यांनी ही एफआयआर नोंदवली. प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी सभा घेतली आणि कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष केले, असा आरोप ठेवला आहे.
दरम्यान यासंदर्भात पटणा येथे बोलताना राहूल गांधी यांनी या केसेस म्हणजे माझ्यासाठी मेडल असल्याचे म्हटले आहे. ‘मी दरभंगा येथे जातनिहाय जनगणनेविषयी बोललो. तसेच विद्यापीठ व महाविद्यालयात आरक्षणाबाबतीत जो कायद्या आहे त्याला पूर्ण क्षमतेने लागू केले गेले पाहिजे. तसेच ५० टक्के आरक्षणाची मर्यादाही हटवली पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करणारच’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.