Uddhav Thackeray Birthday
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र युद्धाची लढाई आपण सोबत लढू, अशा शब्दांत शुभेच्छा देत आघाडी बळकट असल्याचे संकेत दिले.
सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना "शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीतील आमचे सहकारी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. उद्धव ठाकरेंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि महाराष्ट्रातील लोकांच्या हिताची आणि अधिकाराची लढाई आपण सोबत लढू," असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा लक्षवेधी आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्र हिताची आणि महाराष्ट्रातील लोकांच्या अधिकारांच्या लढाईविषयी बोलून इंडिया आघाडी एकत्र राहण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत.