rahul gandhi-PM Modi file photo
राष्ट्रीय

Rahul Gandhi: कठीण काळ येतोय... मोदींनी देशाची आर्थिक घडी विस्कटली; राहुल गांधींचा इशारा, नेमकं काय म्हणाले?

देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मोहन कारंडे

Rahul Gandhi

नवी दिल्ली: देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "देशावर लवकरच मोठं आर्थिक संकट ओढवणार असून आगामी काळ अत्यंत कठीण असेल," असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्यांदा केलेल्या दरवाढीनंतर त्यांनी सरकारला धारेवर धरले.

मोदींनी देशाची आर्थिक घडी विस्कटली

रायबरेली दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, "देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण काळ येत आहे. कोणतीही ठोस कृती करण्याऐवजी पंतप्रधान मोदी लोकांना परदेश दौरे न करण्याचा सल्ला देत आहेत. मोदींनी देशाची आर्थिक घडी विस्कटून टाकली आहे. मी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगतोय की देशावर आर्थिक संकट घोंघावतंय. त्यांची ‘अदानी-अंबानी’ केंद्रित रचना फार काळ टिकणार नाही; ती कोसळेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, याचा फटका मात्र सामान्य माणसाला बसेल," असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान परदेश दौऱ्यावर, जनतेला मात्र सल्ले: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरूनही टीका केली. ते म्हणाले की, "या आर्थिक धक्क्याचा परिणाम अदानी, अंबानी किंवा मोदींवर होणार नाही, तर तो सामान्य माणसावर खोलवर परिणाम करेल. हा परिणाम अभूतपूर्व असेल. परिस्थिती गंभीर होत असताना उपाययोजना करण्याऐवजी मोदी लोकांना परदेश दौरे टाळण्याचा सल्ला देत आहेत, तर दुसरीकडे ते स्वतः मात्र परदेश दौऱ्यावर आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम की राजकीय खेळी?

अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ हार्मुज'चा मार्ग विस्कळीत झाला आहे. जागतिक बाजारात किमती वाढूनही, संवेदनशील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने किरकोळ बाजारातील इंधन दर गेल्या दोन वर्षांपासून स्थिर ठेवल्याचा दावा केला होता. मात्र, काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळेच सरकारने ही दरवाढ रोखून धरली होती, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT